औरंगाबाद महानगरपालिकेतील भाजपचे सर्व नगरसेवक राजीनामे देण्याच्या तयारीत ?

0
473

औरंगाबाद, दि.१४ (पीसीबी) –औरंगाबाद महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपकडून आज औरंगाबाद महानगरपालिकेतील शिवसेनेसोबतची युती संपुष्टात आल्याची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे यानंतर महानगरपालिकेतील भाजपचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील, अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता औरंगाबादमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

भाजपचे विजय औताडे यांनी औरंगाबाद शहराच्या १६८० कोटी रुपयांच्या योजनेला स्थगितेचे कारण  सांगत उपमहापौरपदाचा शुक्रवारी अचानकपणे राजीनामा दिला होता. भाजपा-शिवसेना युतीची औरंगाबाद महापालिकेवर ३० वर्षांपासून सत्ता आहे.औरंगाबाद महापालिका निवडणुकीस अवघे पाच महिने शिल्लक आहेत. आगामी निवडणुकीत स्वतंत्रपणे लढल्यास काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दरम्यान, भाजपने साथ सोडल्यानंतरही आपल्याला फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेने व्यक्त केली होती. आम्ही सत्तेचा सारा डोलारा सांभाळण्यास पूर्ण सक्षम आहोत, असे शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी म्हटले होते.