आयटी अभियंत्याची कांदा पुरविण्याच्या बहाण्याने ‘अशी’ केली लाखोंची फसवणूक

0
217

पिंपरी, दि.८ (पीसीबी) : आयटी अभियंता असलेल्या व्यक्तीने जोडधंदा म्हणून भाजीपाला पुरविण्याचा व्यवसाय सुरु केला. मोठ्या प्रमाणात कांद्याची आवश्यकता असल्याने त्यांनी एकाकडे संपर्क केला आणि कांदा पुरविण्यासाठी एक लाख रुपये दिले. मात्र पैसे घेतल्यानंतर त्या व्यक्तीने कांदा पुरवला नाही. तसेच घेतलेले पैसेही परत केले नाहीत. याप्रकरणी न्याय मागण्यासाठी आयटी अभियंता असलेल्या व्यक्तीने पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. अश्वनाथ टी नायर (रा. तळेगाव दाभाडे) यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला आहे. अमोल थिटे (रा. राजगुरूनगर, ता. खेड) या व्यक्तीने आर्थिक फसवणूक केली असल्याचे नायर यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

तक्रारदार नायर हे आयटी क्षेत्रात उच्च पदावर काम करतात. त्यांनी जोडधंदा म्हणून भाजीपाला पुरविण्याचा व्यवसाय सुरु केला. महाराष्ट्रातून ते भाजीपाला त्यांच्या गावी पाठवत असत. त्यांच्या गावी कांद्याची मागणी वाढल्याने त्यांनी अमोल थिटे यांच्याशी संपर्क केला. थिटे यांनी नायर यांना सुमारे 25 ते 50 टन कांदा पुरविण्याचे आश्वासन दिले. नायर यांनी त्यांच्या बँक खात्यावरून थिटे यांच्या बँक खात्यावर एक लाख रुपये पाठवले. पैसे दिल्यानंतर दुस-या दिवशी नायर कांदा आणण्यासाठी थिटे यांच्याकडे गेले. मात्र थिटे यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन कांदा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे नायर यांनी थिटे यांना दिलेले पैसे परत मागितले. त्यावर थिटे यांनी एक धनादेश देऊन तो दोन दिवसांनी बँकेत भरण्यास सांगितले. मात्र धनादेश बँकेत भरला असता तो बाउंस झाला. एक वर्षानंतर देखील थिटे यांनी नायर यांचे पैसे दिले नाहीत. थिटे हे गुंड प्रवृत्तीचे आहेत. ‘मी तुझे पैसे देत नाही. काय करायचे ते कर मी कोणालाही घाबरत नाही. पोलिसांकडे जा, नाहीतर कोणाकडेही जा. मी तुझे पैसे देणार नाही’ अशी थिटे यांनी नायर यांना धमकी दिली. याबाबत न्याय मिळवून देण्याची मागणी नायर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.