आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही – संजय राऊत

0
717

मुंबई,दि.१७(पीसीबी) – आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमीत्त स्मृतींना अभिवादन करण्यासाठी संजय राऊत शिवतिर्थावरती उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी फडणवीसांच्या खोचक ट्विट बद्दल विचारलं असता, शिवसेनेला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही या शब्दात त्यांनी फडणवीसांच्या ट्विट ला उत्तर दिले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत. ‘स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला !’ असं कॅप्शन देत फडणवीसांनी व्हिडीओ शेअर केला आहे. स्वाभिमान जपण्याचा खोचक सल्ला फडणवीसांनी शिवसेनेला दिल्याच्या चर्चा आहेत.

‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…’ या बाळासाहेबांच्या आवाजातील ओळींनी हा व्हिडीओ सुरु होतो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलताना ऐकू येतात.

‘हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करतो. स्वर्गीय बाळासाहेब आमच्या सगळ्यांकरता एक अत्यंत स्फूर्ती देणारं प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होतं. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्व प्रकारचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल, असे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब हे ऊर्जेचा स्रोत होते. छोट्यातल्या छोट्या माणसाला केवळ बाळासाहेबांच्या विचाराने ऊर्जा मिळायची, त्यांना बघितल्यामुळे ऊर्जा मिळायची. आपल्या एका
वाक्याने प्रेरित करायची क्षमता आणि किमया ही आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती’ असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यानंतर बाळासाहेबांच्या काही जुन्या चित्रफिती या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात.

‘आज स्वाभिमान तुमचा जोपर्यंत जिवंत राहील, तोपर्यंत या देशाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे,
नाहीतर रसातळाला चाललंय.’

‘नाव आणि पैसा. पैसा येतो, पैसा जातो, पैसा पुन्हा मिळवता येतो, पण एकदा का नाव गेलं की पुन्हा येत
नाही. ते येऊ शकत नाही. काळ्या बाजारातसुद्धा मिळायचं नाही. म्हणून नाव जपा. नाव मोठं करा’

अशा बाळासाहेबांच्या भाषणातील दोन ओळी ऐकू येतात.