आमदार लक्ष्मण जगताप यांचे विरोधकांवर “शास्ती स्ट्राईक”; आता विरोधक श्रीमंतांची तळी उचलणार का?

0
1080

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर सरकारकडून माफ करून घेत विरोधकांची हवाच काढून घेतली आहे. शास्तीकराच्या माफीसाठी सत्ताधारी भाजपला घेरणाऱ्या विरोधकांवर आमदार जगताप यांनी केलेले हे “शास्ती स्ट्राईक” मानले जात आहे. एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ होणार असल्याने शहरातील हजारो नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे. आमदार जगताप यांनी निवडणुकीत शास्तीकर माफीचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळल्यामुळे आता विरोधक त्यांचे अभिनंदन करणार की या निर्णयातही पळवाट शोधत संपूर्ण शास्तीकर माफीची मागणी करून अनधिकृत बांधकामे केलेल्या श्रीमंतांची तळी उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अनधिकृत बांधकामे आणि अशा बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर हा गेल्या एक दशकापासून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात कळीचा मुद्दा बनला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात या मुद्द्याचे केवळ भांडवल झाले. परंतु, प्रश्न “जैसे थे”च राहिला. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जोर बैठकांच्या पलीकडे जाऊन हा प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती नव्हती. त्यामुळे शहरातील जनतेने करपलेली भाकरी पालटली आणि केंद्र, राज्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपला बहुमत दिले. शहराचे नेतृत्व आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानसभा आणि महापालिका या दोन्ही निवडणुकीत शहरातील जनतेला अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकरातून दिलासा देण्याचा शब्द दिला होता. त्यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. अधिवेशन असो की मुख्यमंत्र्यांचे पुणे जिल्ह्यात दौरे असोत आमदार जगताप यांनी या दोन ज्वलंत प्रश्नांवर सरकारचा पिच्छा काही सोडला नाही.

आमदार जगताप यांची प्रश्न सोडवण्याची ही चिकाटी पाहून मुख्यमंत्र्यांनी ६०० चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ केला. तसा कायदाही केला. त्यामुळे छोटी छेटी घरे बांधून राहिलेल्या पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना कायमचा दिलासा मिळाला. परंतु, एक गुंठ्याच्या जागेत अनधिकृत बांधकामे बांधलेल्या किंवा बिल्डरांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामातील ७००, ८००, ९०० चौरस फुटांच्या सदनिका खरेदी केलेल्या नागरिकांच्या डोक्यावर शास्तीकराची टांगती तलवार कायम होती. ती नाहीशी करण्याच्या इराद्याने आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने निवेदने दिली. विविध विकासकामांच्या उद्घाटनांसाठी आणि मेळाव्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराच्या प्रश्नाची कायम जाणीव करून दिली.

आमदार जगताप यांनी प्रश्न सोडवण्यासाठी लावलेल्या या रेट्यापुढे मुख्यमंत्री फडणवीस यांनाही अखेर झुकावे लागले. मुख्यमंत्र्यांना एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करण्याचा निर्णय घेण्यास त्यांनी भाग पाडले. आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय संपूर्ण राज्यभरासाठी लागू होणार आहे. शास्तीकर माफीच्या या निर्णयाने आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमधील आपल्या विरोधकांवर “शास्ती स्ट्राईक” केल्याचे मानले जात आहे. तसेच भाजप केवळ गाजर दाखवते, असे म्हणणाऱ्या विरोधकांची त्यांनी हवाच काढून घेतली आहे. शास्तीकर माफीसाठी आतापर्यंत आंदोलन करणाऱ्या विरोधकांची त्यांनी बोलतीच बंद करून टाकली आहे. एवढा मोठा आणि जटिल प्रश्न सोडवून सामान्यांना दिलासा दिल्याने विरोधक आमदार जगताप यांचे अभिनंदन करणार की आपल्यातील कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवणार हे पहावे लागणार आहे.