आधार च्या मदतीने जन्मदिनांक दुरुस्ती शक्य

0
407

पुणे, दि. २७ (पीसीबी) – पुणेकर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) खातेधारकांना आपले भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खाते उघडताना नोंदविलेल्या जन्मतारखेत घरबसल्या सुधारणा करता येणार आहे. त्यासाठी खातेधारकांना ‘ईपीएफओ’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करताना आधार क्रमांक द्यावा लागणार आहे.

खातेधारकाच्या जन्मनोंदीमध्ये दुरुस्ती करताना आधार कार्डवरील जन्मतारीखच ग्राह्य धरली जाणार आहे.करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सेवांची उपलब्धता आणि व्याप्ती वाढविण्यासाठी ‘ईपीएफओ’ प्रयत्नशील आहे. त्यासाठीच ‘ईपीएफओ’ने पीएफ सदस्यांना जन्म तारखेमध्ये जर सुधारणा करावयाची असेल तर त्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी सर्व विभागीय पीएफ कार्यालयांना सूचना देण्यात आल्या असून, पीएफ सदस्यांच्या खात्याची ‘केवायसी’ करून घेण्यासही सांगितले आहे.

या संदर्भात ‘ईपीएफओ’च्या पुणे व आकुर्डी कार्यालयातर्फे दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जन्मतारीख बदलण्यासाठी पीएफ खातेधारकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे सादर करावी लागत होती. मात्र, ईपीएफओच्या नव्या निर्देशांनुसार, आधारकार्डात नमूद जन्म तारीखच ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार, खातेधारकाला जन्मतारखेत सुधारणा करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. या क्रमांकाच्या आधारे ईपीएफओ ‘यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया’कडे (यूआयडीएआय) खातेधारकांच्या जन्मतारखेची पडताळणी करू शकणार आहे. त्यामुळे पूर्वी कागदपत्रांची पडताळणी व अन्य प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी कमी होणार असून, खातेधारकाच्या अर्जाचा वेळेत निपटारा होण्यास मदत मिळणार आहे.