आत्मविश्वास गमावलेली काँग्रेस आणि दुबळी पडलेली राष्ट्रवादी आता चांगल्या उमेदवाराच्या शोधात

0
451

उस्मनाबाद, दि.२६ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत मनोमीलन होऊन पुन्हा एकजीव झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मोठा सुरुंग लागला आहे. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पक्षांतरानंतर आत्मविश्वास गमावलेली काँग्रेस आणि दुबळी झालेली राष्ट्रवादी आता उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात तगडा उमेदवार उतरविण्यासाठी रात्रंदिवस उमेदवाराच्या शोधात आहे. सध्या ज्या नावांची चर्चा सुरू आहे, त्यापैकी एक की नवख्या चेहऱ्याला राष्ट्रवादी संधी देईल, हे येणारा काळच ठरविणार आहे. दुसरीकडे महायुतीतील भाजपाची जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात पक्षीय ताकद वाढली असली, तरी शिवसेनेच्या अरेरावीच्या भूमिकेमुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परिणामी मिळून काम करण्याऐवजी एकमेकांसमोर शड्ड ठोकून कार्यकत्रे उभे राहू लागले आहेत. सेनेला जागा सुटली तर शिवसेनेकडून खासदार ओमराजेंचे बंधू जय राजेनिंबाळकर यांच्या नावाची चर्चा तर भाजपामधून राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या समाजमाध्यमात सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती होणार की नाही, झाली तर उस्मानाबादची शिवसेनेची जागा भाजपाला मिळणार की, सेनेकडेच राहणार, याकडे सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांनंतर प्रारंभ होईल. मात्र राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी असूनही उमेदवार निवडीच्या मुद्दय़ावर एकत्र काम करताना दिसत नाही. त्यामुळे एकला चलो रे भूमिकेमुळे आघाडीचेच मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असताना राष्ट्रवादी भवनची वास्तू गजबजलेली असायची. मात्र आता तीच वास्तू भाजपचे कार्यालय होणार असल्याने आता राष्ट्रवादीला स्वत:चे कार्यालय सुरू करण्यासाठी अन्यत्र जागा पाहावी लागेल.  भाजप-सेनेच्या युतीचा तिढा अजूनही जशास तसा आहे. युती झाली आणि उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून जर भाजपमधून राणाजगजितसिंह पाटील मदानात उतरले तर शिवसेना युतीचा विचार न करता त्यांचा विरोधात काम करेल, अशी भूमिका खासदार ओम राजेिनबाळकर आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांनी बोलून दाखविली आहे. त्यांनी ही जागा सेनेचीच राहील, अशी ठाम भूमिका घेतली आहे. मात्र उमेदवाराचा चेहरा समोर आलेला नाही. समाजमाध्यमावर ओमराजेंचे बंधू जय राजेिनबाळकर, कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीतून सक्षणा सलगर, अमित शिंदे अशी नावे चच्रेत आहेत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. यंदाच्या विधानसभेत भाजपाला उस्मानाबादची जागा सुटावी म्हणून प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर हे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करत असले, तरी शिवसेना त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सध्या तरी चित्र आहे.