“आता सर्व मंत्रीगण म्हणतात…आता लॉकडाऊन – संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय”

0
272

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. राज्यातील लॉकडाउन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसेच, प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे.

याचबरोबर उद्यापासून दुकानं उघडण्याच्या व्यापाऱ्यांच्या भूमिकेबद्दलही आज किंवा उद्या निर्णय होईल, अशी देखील माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आज सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षांचे नेते विरोधी पक्षनेते व महाविकासआघाडीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवारी) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दहावी आणि बारावीची परीक्षा तसेच निर्बंध शिथिल करायचे की अधिक कठोर करायचे यावर विचारविनिमय केला जाईल. रुग्णसंख्या कमी होत नसल्याने निर्बंघ अधिक कडक करण्याचा सल्ला कृती दल व अन्य तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे.

आता बाळासाहेब थोरत सुध्दा म्हणतात…
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कडाडून विरोध केला होता. मात्र, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने थोरात बॅकफूटवर आले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी आणखी कडक निर्बंध राज्यात लागू करण्याबाबत सुतोवाच केलं आहे. त्यामुळे थोरातही तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनला अनुकूल असल्याचं बोललं जात आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी हे संकेत दिले आहेत. ते संगमनेर येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. राज्यात अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाची साखळी तोडून कोरोनाबळींची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. मृत्यूंची संख्या वाढते ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं थोरात यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचं अतोनात नुकसान होत आहे. ज्यांच्या हातावर पोट आहे, त्यांची अवस्था तर खूपच बिकट आहे. कोरोना हे जागतिक पातळीवरील संकट आहे. मानवतेवर आलेलं संकट आहे. त्यामुळे या संकटाला सर्वांना सामोरे जावं लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन होऊ शकतो. याबाबत आज मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन बाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. कोरोना वाढत चालल्याने आता 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात…
दरम्यान, लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक आहे. आज मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हाच मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला असून येणाऱ्या आज त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, असं वडेट्टीवार म्हणाले. तीन आठवड्यांचा हा लॉकडाउन कडक स्वरूपाचा असायला हवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा द्यावी अशी मागणीही केली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.