अल्पवयीन मुलीसोबत वृद्ध सुरक्षा रक्षकाचे अश्लील चाळे; गुन्हा दाखल

0
320

रावेत, दि. ७ (पीसीबी) – सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या एका 60 वर्षाच्या सुरक्षा रक्षकाने सोसायटीत राहणा-या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 5) सकाळी सव्वाअकरा आणि शनिवारी (दि. 6) सकाळी सात वाजता रावेत येथे घडला.

बाबुराव लालबा वणे (वय 60, रा. रावेत) असे आरोपी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील एका सोसायटीमध्ये आरोपी बाबुराव सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. शनिवारी सकाळी फिर्यादी महिलेने त्यांच्या अल्पवयीन मुलीला सोसायटीच्या बाहेर असलेल्या दुकानातून दूध आणण्यासाठी पाठवले. बराच वेळ झाला तरी मुलगी दूध घेऊन आली नाही, म्हणून फिर्यादी मुलीला बघण्यासाठी गेल्या असता सोसायटीच्या गेटवर आरोपी बाबुराव याने अल्पवयीन मुलीला हाताला पकडून ठेवले होते. फिर्यादी यांनी मुलीला ओरडून तिला घरी नेले.

मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सांगितले की, बाबुराव याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले आहेत.’ दरम्यान फिर्यादी यांच्या सोसायटीत राहणा-या महिलांनी सांगितले की, आरोपी बाबुराव याने शुक्रवारी देखील फिर्यादी यांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले आहेत.’ याबाबत आरोपी सुरक्षा रक्षक बाबुराव याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, पॉक्सो कलम 7, 8, 9 (एम) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.