“अर्णब गोस्वामी यांची अटक आणि भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर अविवेकाची काजळी!”

0
268

माझे मत –
अरुण खोरे (जेष्ठ पत्रकार)
——————————
………………………………….
आज सकाळी रायगड पोलिसांनी रिपब्लिक वाहिनीचे प्रमुख संपादक अर्णव गोस्वामी यांना एका व्यावसायिकाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या प्रकरणासंदर्भात अटक केली. त्यानंतर रिपब्लिक वाहिनीवर आणि विविध वाहिन्यांवर यासंबंधीच्या बातम्या सुरु झाल्या. आज दुपारी नागपुरात असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आजचा दिवस हा काळा दिवस असे जाहीर करून, आणि आणीबाणीची आठवण होते आहे असे वक्तव्य करून भाजप राज्यभर आंदोलन छेडेल, अशी घोषणा केली. त्यानुसार भाजपची आंदोलने आता सुरू होतीलही. तिकडे केंद्र सरकार मधील मातब्बर असे गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सर्वांनीच आणीबाणीच्या दिवसाची आठवण येते असे सांगून महाराष्ट्रात चौथ्या स्तंभावर हल्ला होत असल्याची भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हीच भूमिका घेतली आहे.

माझ्या दृष्टीने या प्रकरणात भारतीय जनता पक्षाने घेतलेली भूमिका ही अविवेकाची काजळी आहे. ती दूर सारून या सर्व जेष्ठ नेत्यांनी अर्णव गोस्वामी यांना अटक कोणत्या प्रकरणात झाली याची माहिती घ्यावी आणि त्यांच्या सर्वांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या तपासात काहीही फेरफार होणार नाही, याचीही दक्षता घेतली पाहिजे,असे मला एक लोकशाहीवादी पत्रकार म्हणून स्पष्ट सांगावेसे वाटते.

याबाबतीत काही संदर्भ आता स्पष्ट झाले आहेत अन्वय नाईक या गृहस्थांनी रिपब्लिक वाहिनीच्या स्टुडिओचे जे काम केले होते त्या कामाचे ८३ लाख रुपये त्यांना मिळणे बाकी होते. सतत तगादा लावूनही ते मिळाले नाहीत.

याखेरीज आणखी दोन लोकांकडून नाईक यांना चार कोटी पेक्षा अधिक रक्कम मिळायची बाकी होती. या सर्व संदर्भात पाठपुरावा केल्यावर हाती काहीच न लागल्यामुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली. यासंबंधी जी सुसाईड नोट आज दुपारी पत्र पत्रकार परिषदेत पत्रकारांना पाठवण्यात आली, त्यातील तपशीलात गोस्वामी, फिरोज शेख आणि सरडा यांची नावे नमूद आहेत. यासंदर्भात नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि त्यांच्या कन्येने पत्रकारांशी आज दुपारी बोलत असताना अनेक तपशील दिले. दोन वर्षापूर्वीच्या या घटनेची चौकशी रायगड पोलिसांनी बंद करून टाकली. आम्ही याबाबत पंतप्रधान कार्यालयात देखील पत्रे पाठवली; तथापि त्याचा उपयोग झाला नाही असे या मायलेकींनी आज स्पष्टपणे सांगितले.

रिपब्लिक वाहिनीवर आज सकाळपासूनच गोस्वामी यांच्या अटकेचा एक कलमी कार्यक्रम आणि त्याचे प्रक्षेपण हेच प्रेक्षकांना बघायला मिळत होते. अजूनही तोच विषय चालू आहे आणि त्यात आता भारतीय जनता पक्षाने अविवेकी भूमिका घेऊन महाराष्ट्रभर आंदोलने करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीतही जंतर-मंतर वर गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आंदोलने सुरू आहेत.

सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे एडिटर्स गिलड ऑफ इंडियाने या या अटकेचा निषेध केला आहे. त्यामुळे देशभर आता याबाबत व्यापक मंथन व्हावे अशी अपेक्षा असली तरी, भारतीय जनता पक्षाच्या पक्षपातीपणामुळे माध्यमांच्या जगातील सगळेच विवेकी आवाज व्यक्त होतील, अशी शक्यता फारशी वाटत नाही.आज दुपारी एका प्रचारसभेत बोलताना तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यांनीही गोस्वामी यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रात आणीबाणीचे वातावरण निर्माण झाले की काय असे वक्तव्य केले.

एकूणच भारतीय जनता पक्षाने हा विषय आता आपल्या हातात घेतला आहे आणि त्यामुळे तो किती जळजळीत होईल किंवा विखारी होईल याची आपण कल्पनाही करू शकत नाही ! पत्रकारितेतील माझे अनेक मित्र काही सहकारी असलेले अनेक जण आज समाज माध्यमात गोस्वामी यांच्या बाजूने ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत ते वाचल्यावर ही सगळी मंडळी इतका दीर्घकाळ कोणासाठी पत्रकारिता करत होती याचे उत्तर मिळते.

याबाबत एक पत्रकार म्हणून मी महाराष्ट्र पोलिसांना विनंती करीन की,या सर्व प्रकरणांमध्ये अर्णव गोस्वामी यांना कायदेशीर मदत मिळण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये किंवा अडचण निर्माण केली जाऊ नये.

महाराष्ट्रातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी याबाबत जे निवेदन प्रसिद्ध केले आहे, ते अतिशय योग्य आहे. त्यांच्या मते गोस्वामींची अटक म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर असा हल्ला असा रंग त्याला देता कामा नये.

एका आत्महत्येच्या प्रकरणात सुसाईड नोटच्या आधारे रायगड पोलिसांनी देशातील या स्टार संपादकाला अटक केली आहे, हे वास्तव विसरता येणार नाही. बॉलिवूडचा उमदा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. त्यानंतर रिपब्लिक टीव्ही वाहिनी आणि तिचे संपादक असलेले गोस्वामी यांनी एकूणच जी ‘मीडिया ट्रायल’, सुरू केली; ती इतकी भयंकर होती,की त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी एखादे नाव घेण्यापूर्वीच गोस्वामी यांच्या वाहिनीवर नावे घेतली जायची! इतकेच नव्हे तर व्हाट्सअप संवादाचे तपशीलही पडद्यावर दाखवायला सुरुवात झाली. रिया चक्रवर्ती ही सुशांतची मैत्रीण. तिला अटक का होत नाही इथपासून, ते मुंबईच्या पोलीस आयुक्तांना हटवले का जात नाही, इथपर्यंत ही मीडिया ट्रायल सुरू होती. यात त्यांच्या बाजूने असणाऱ्या कंगना राणावत सारख्या अभिनेत्रींना झुकते माप मिळाले. त्यानंतर मग सीबीआयने यात लक्ष घातल्यावर जे राजकारण सुरू झाले त्याचे पुढे काय झाले हे कोर्टात अनेक वेळा समोर आले आहे.

एकूणच चौथा स्तंभ म्हणजे न्यायपालिकेचा उपविभाग नव्हे, हे तरी या निमित्ताने या वाहिन्यांना, पत्रकारांना, त्यांच्या संपादकांना लक्षात आले नसेल तर मात्र आपल्या ७० वर्षे वय असलेल्या लोकशाहीचे अवघडच आहे! या कव्हरेजच्या काळात गोस्वामी जी उद्धट आणि अरेरावीची आणि प्रसंगी एकेरी भाषा वापरत होते, त्यामुळे माध्यमातील सभ्यतेला तिलांजली दिली गेली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, मुंबई पोलीस आयुक्तांना, राज्याच्या गृहमंत्र्यांना ज्या पद्धतीने हा संपादक संबोधत होता ती संपूर्ण भाषा आणि त्याची देहबोली हे सगळेच असंस्कृत आणि असभ्य अशा पातळीवरचे होते.

सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याला न्याय देण्यासाठी, त्याच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्यासाठी हे सगळे सुरू होते आणि मुंबई पोलिस काही करू शकत नाही, अशा पद्धतीचा एक निष्कर्षही या कव्हरेजमधूनही ही वाहिनी मांडत होती. महाराष्ट्राच्या पोलिसांवर आणि बॉलीवूडवर टीका करणारी काही आंदोलने याच काळात दिल्लीतील जंतरमंतरवरही झाली होती आणि तिला कोणाचे समर्थन होते हे सांगण्याची आवश्यकता नाही.

एकूणच या निमित्ताने बिहारचा सुपुत्र आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यात एक अघोषित लढाई लावण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पास्वान यांनी तर कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने जी कारवाई केली त्यासंबंधी रागाने बोलत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आली पाहिजे, अशी मागणी केली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे याच दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणा अशी मागणी केली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कसे अडचणीत येईल अशा पद्धतीची भूमिका सतत घेतली जात होती. सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर पालघरजवळच्या एका गावात दोन साधूंच्या हत्येचा विषय देखील अतिशय चिघळला. त्याचेही भांडवल या वाहिनीने फार मोठ्या प्रमाणात केले. अयोध्येतील अनेक साधुसंतांनी तर त्याचा निषेध केला. या झालेल्या हत्या निषेधार्ह होत्याच; पण त्याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्रातील पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी जी वक्तव्ये राजकीय हेतूने केली जात होती ती अप्रस्तुत आणि अयोग्य होती असे माझे मत आहे.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार या दोघांमध्ये अनेक विषयांची संघर्ष सध्या सुरू आहेत आजच्या अंगावर स्वामी अटक प्रकरणाने त्याला आता आणखी धार करण्याची चिन्हे आहेत. पण हे सगळेच लोकशाहीला मार्ग कसे आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी संवाद चर्चा आणि कायद्याचे पालन करण्याची मानसिकता याची गरज आहे.

यापूर्वीच्या सरकारच्या काळात रायगडच्या पोलिसांनी अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटची गंभीर दखल न घेता ते सगळेच प्रकरण फाईल बंद का केले, हा गंभीर असा विषय आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केलीच पाहिजे! या प्रकरणाची फाईल बंद करण्याचा निर्णय घेणारे पोलीस अधिकारी, त्यांना सल्ला देणारे वकील आणि या सर्वांच्या मागे उभ्या असलेल्या राजकीय शक्ती या सर्वांबाबत काहीतरी कारवाई करता येईल का, याचा विचार केला पाहिजे. शेवटी कायदा आहे आणि त्याचे पालन व्हायला हवे, असे जर आम्हा सर्वसामान्य लोकांना वाटत असेल तर त्यात चुकीचे काय आहे?

दुसरा मुद्दा असा आहे की, गोस्वामी नेहमी महाराष्ट्र सरकार विरुद्ध बोलतात, मुंबई पोलीस आयुक्ताविरुद्ध टीका करतात; त्यामुळे कोणतेही प्रकरण काढून त्यांना अडकवणे, टीआरपी प्रकरणात त्यांच्या अनेक बातमीदारावर गुन्हे दाखल करणे अशा पद्धतीची संशयास्पद कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेणे ही देखील अनुचित आणि चुकीची गोष्ट आहे. लोकशाहीतील संस्थांच्या प्रमुखांची नावे घेऊन टीका होत असली तरी संस्थेचा प्रमुख म्हणून हे होते आहे, अशी भूमिका संबंधित व्यक्तीची असली पाहिजे. माझ्यावर व्यक्तिगत आरोप किंवा हल्ले होत आहेत, असा बचाव करून आपल्या चुकीच्या कारवाईचे किंवा संशयास्पद भूमिकेचे समर्थन उच्च स्थानी असलेल्यांनी करू नये, हा लोकशाहीचा संकेत आहे.

आज सकाळी, खरे म्हणजे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाच्या बातम्या मी पाहत होतो आणि त्याच दरम्यान अर्णव गोस्वामी अटकेचा विषय सुरू झाला. आज दुपारी नाईक यांच्या पत्नी आणि मुलगी यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्या विषयाची कायदेशीर प्रक्रियेतील तार्किक परिणती होणे आवश्यक आहे. आणि या कुटुंबातील दोघांना आत्महत्या करावी लागली, त्यामागे असलेले जे घटक आहेत, त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रियेतून कारवाई व्हावी, अशीच आपल्या सर्वांच्या अपेक्षा आहेत.

आमच्या अनेक मित्रांनी गोस्वामी यांच्याबाबत जी भाषा समाज माध्यमात वापरली आहे ती देखील चुकीची आहे आणि अशा भाषेतून आपला राग किंवा विरोध व्यक्त करणे हे असमंजस समाजाचे लक्षण असते, हे आपण विसरता कामा नये!

मी एक साधा पत्रकार आहे पण अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून आजवर काम करीत आलो आहे. म्हणूनच आज मी ही भूमिका मांडण्याचे धाडस केले आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मी ज्या कोथरूडमध्ये राहतो, तेथील आमदार आहेत. कोथरूडमध्येच आमचे ज्येष्ठ सन्मित्र प्रकाश जावडेकर आणि भाजपचे अनेक पदाधिकारी,जे कॉलेजपासून माझे मित्र असलेले अनेक जण वास्तव्याला आहेत, त्या सर्वांना माझ्या भूमिकेतील बांधिलकी आणि सच्चेपणा हा निश्चितपणे लक्षात येईल. भारतीय जनता पक्षासारखा सत्तारूढ असलेला मोठा पक्ष माझ्या भूमिकेबाबत अजिबात गंभीर घेणार नाही, असे मला सांगण्यात आले असले तरी या संसदीय लोकशाहीचा एक किरकोळ घटक असलेला पत्रकार म्हणून मी माझी भूमिका मांडली आहे. माझे कोणाशी भांडण नाही पण या लोकशाहीला संकट ठरणाऱ्या अविवेकी भूमिकेला विरोध करणे हे मी माझे कर्तव्य समजतो,तेच आज मी केले आहे.