अयोध्या दौऱ्यावरून उध्दव ठाकरेंवर हार्दिक पटेल, कन्हैया कुमारांचे टीकास्त्र

0
1253

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – महाराष्ट्रातील शेतकरी सरण रचून आत्महत्या करत आहे. मात्र, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मंदिराचा मुद्दा घेऊन अयोध्या दौरा करत आहेत, अशी टीका पाटीदार नेता  हार्दिक पटेल यांनी आज (रविवार) येथे केली.  तर अयोध्या हा आस्थेचा विषय आहे, यावर राजकारण करायला नको. मंदिर बांधले का? असा प्रश्न विचारु नका तर हॉस्पिटल, शाळा बांधल्या का? असा प्रश्न सरकारला विचारा. मंदिर हा प्रश्न नाहीच देशासमोर जे मुख्य प्रश्न आहेत, ते दुर्लक्षित केले जात आहे, अशी टीकाही यावेळी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी केली.  

मुंबईत आज (रविवार) विरोधक आणि वेगवेगळ्या १७ संघटनांच्या वतीने संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पटेल, कन्हैया कुमार बोलत होते.  या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आदी सहभागी झाले आहेत. सरकारकडून होत असलेल्या संविधान बदलाच्या हालचाली व सरकारच्या अपयशी धोरणांमुळे या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी हार्दिक पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली .

अयोध्येत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. मात्र १४४ कलम लागू करुन सुद्धा शिवसेना, विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसचे कार्यकर्ते इतक्या मोठ्या प्रमाणात आले कसे? आम्ही आंदोलन केले की मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात येते, अशा शब्दात हार्दिक पटेल यांने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.