अयोध्या खटल्याची नवीन घटनापीठासमोर २९ जानेवारीला सुनावणी

0
440

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – अयोध्येतील राम जन्मभूमी- बाबरी मशीद जमीन हक्काच्या वादासंबंधी  सर्वोच्च न्यायालयात २९ जानेवारी रोजी सुनावणी  घेण्यात येणार आहे.  न्यायमूर्ती यू यू लळित यांनी घटनापीठातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता नवीन घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी घेण्यात येणार आहे.  

अयोध्या प्रकरणावर आज ( गुरुवारी) सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे घटनापीठाचे अध्यक्ष आहेत. त्यात शरद बोबडे, एन. व्ही. रमण, उदय उमेश लळित आणि धनंजय चंद्रचूड या न्यायमूर्तींचा समावेश होता. आज कामकाज सुरु होताच मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी वाद-प्रतिवादाला सुरुवात करुया, असे सांगितले. यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले की, आपण सुनावणीच्या पुढच्या तारखांवर आणि कालमर्यादावर चर्चा करणार आहोत.

यानंतर राजीव धवन यांनी न्या. उदय उमेश लळित यांचा मुद्दा उपस्थित केला. लळित यांनी वकील असताना बाबरी मशीद प्रकरणातील एका आरोपीची बाजू मांडली होती. त्यामुळे या प्रकरणातील घटनापीठात लळित यांच्या समावेशावर धवन यांनी आक्षेप घेतला. यानंतर न्या. लळित यांनी देखील या प्रकरणातील सुनावणीपासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केली. अखेर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी २९ जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय दिला.