अमेरिकेच्या ऊर्जा विभागावर सर्वात मोठा सायबर हल्ला

0
268

– रशियाने हा हल्ला केल्याचा अंदाज, महिनाभरापासून सुरू होता हा प्रकार

न्यूयॉर्क, दि.१९ (पीसीबी) – अमेरिकेच्या ऊर्जा विभागावर सायबर हल्ला झाला आहे. हा हल्ला आतापर्यंतच्या कुठल्याही सायबर हल्ल्यापेक्षा मोठा असल्याचं अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने सांगितलं आहे. अमेरिकेच्या अण्वस्त्रांची देखरेख ही या विभागाची मुख्य जबाबदारी आहे. मात्र, हॅकिंगचा शस्रास्त्र गोदामावर कुठलाही परिणाम झाला नसल्याचंही विभागाने स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट या टेक कंपनीनेदेखील आम्हाला आमच्या सिस्टिममध्ये धोकादायक सॉफ्टवेअर सापडल्याचं सांगितलं.

रशियाने हा हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. रशियाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
गेल्या रविवारी अमेरिकेच्या कोषागार आणि वाणिज्य विभागावर सायबर हल्ला झाल्याची माहिती उघड झाली होती. जवळपास महिनाभरापासून हा हल्ला सुरू होता आणि रविवारी त्याची माहिती मिळाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं.

दरम्यान, या सायबर हल्ल्यावर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी अजूनतरी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दुसरीकडे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सायबर सुरक्षेला बायडन प्रशासन सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं म्हटलं आहे.

बायडन म्हणाले, “सर्वात आधी विरोधकांना सायबर हल्ला करण्यापासून रोखायला हवं. आम्ही हे करू आणि याला आमचं प्राधान्य असणार आहे. अशाप्रकारचे हल्ले करणाऱ्यांना मोठी नुकसान भरपाई द्याावी लाागेल. शिवाय, अमेरिकेच्या सहकारी आणि मित्र राष्ट्रांशी चर्चा करून एकत्रितपणे हे लागू करण्यात येईल.”

सायबर सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सी (सीसा) ही अमेरिकेची सर्वोच्च सायबर एजन्सी आहे. गुरुवारी या हल्लाविषयी बोलताना ‘हा हल्ला परतवून लावणं अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक असेल’, असं सीसाने म्हटलं आहे.

या हल्ल्यामुळे ‘महत्त्वाच्या पायाभूत स्ट्रक्चरचं नुकसान’ झाल्याचं सीसाने सांगितलं. तसंच या सायबर हल्ल्यामुळे फेडरल एजंसी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या सुरक्षेलाही बाधा पोहोचली. या नुकसानीमुळे ‘गंभीर धोके’ निर्माण झाल्याचं सीसाचं म्हणणं आहे.

मार्च 2020 मध्येच हॅकिंग सुरू झालं होतं, असंही सीसाने सांगितलं. मात्र, या हल्ल्यात कोणती माहिती चोरण्यात आली, याचा अजून पत्ता लागलेला नाही. ‘मालवेअरमुळे केवळ बिझनेस नेटवर्कचं नुकसान झाल्याचं’ प्रवक्त्या शायलीन हायन्स यांनी म्हटलं आहे.

अण्वस्त्राची सुरक्षा करणाऱ्या नॅशनल न्युक्लिअर सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच NNSA च्या सुरक्षा ऑपरेशन्सचं कुठलंही नुकसान झालं नसल्याची माहितीही त्यांनी दिली .