अभ्यंगस्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही; परिणाम भोगण्याची तयारी – जितेंद्र आव्हाड

0
1137

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, दिवाळी आणि इतर सणांमध्ये रात्री ८ ते १० या वेळेत फटाके वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अभ्यंगस्नान केल्यानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही, परिणाम भोगण्याची  तयारी असल्याचे सांगत न्यायालयाला आव्हान दिले आहे.

आव्हाड यांनी टि्‌वटरवर म्हटले आहे की, अभ्यंगस्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही. लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर फटाके वाजवणारच. फटाके आणि दिवाळी अतूट नाते आहे. त्यामुळे परिणाम भोगण्याची तयारी आहे, असे म्हटले आहे.

पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या तोंडावर फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळी सणात फटाक्यांच्या विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना नेहमीप्रमाणे फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळी सण साजरा करता येणार आहे. मात्र, रात्री ८ ते १० या वेळेत फटाके वाजवता येणार आहेत. त्यामुळे अनेकांनी नाराजी वर्तवली आहे. तर फटाक्यांची ऑनलाईन  विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे  ई –कॉमर्स साईटसवरून फटाके विक्री करता येणार नाही.