अभिनंदन वर्थमानच्या वडिलांचे देशवासियांना उद्देशून भावूक पत्र

0
665

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या विमानांना भारतीय  हवाई दलाने पिटाळून लावले.  यादरम्यान, भारताच्या हवाई दलातील वैमानिक अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या हाती लागले. यानंतर अभिनंदनच्या वडिलांनी देशवासियांना उद्देशून भावूक पत्र लिहिले आहे. अभिनंदनबद्दल दाखवलेल्या काळजीसाठी, केलेल्या प्रार्थनांसाठी देशवासियांचे आभार मानले आहेत.

अभिनंदनचे  वडील सिमहाकुट्टी वर्थमान हे भारतीय वायूदलातील निवृत्त एअर मार्शल आहेत. पत्रात त्यांनी लिहिले आहे की,  माझ्या मित्रांनो, तुमच्या काळजी आणि प्रार्थनांसाठी आभार. मी देवाचे आभार मानतो की, माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही, मानसिकदृष्ट्या ठीक आहे. तो ज्या साहसाने बोलत आहे ते पाहा….एक खरा जवान…. आम्हाला त्याचा अतिशय अभिमान आहे.”

“तुमच्या आशीर्वादाचे हात त्याच्या डोक्यावर आहेत, त्याच्या सुखरुप सुटकेसाठीच्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत, याची मला खात्री आहे. त्याचा छळ होऊ नये, तसेच शरीर आणि मनाने सुखरुप मायदेशी परतेल, यासाठी मी प्रार्थना करतो. अशा नाजूक क्षणी तुम्ही आमच्यासोबत आहात, यासाठी मी आभारी आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि ऊर्जेमुळे आम्हाला बळ मिळाले आहे.