अबब… २५७ कोटी रोकड, १५ किलो सोने, ५० किलो चांदी जप्त

0
441

कन्नौज,दि.२७(पीसीबी) – अत्तराची निर्मिती करणारा अत्तर व्यावसायिक पीयूष जैन आणि त्याचा मुलगा या दोघांना जीएसटी इंटेलिजन्स विभागाने अटक केली. अब्जावधी रुपयांचा जीएसटी भरला नसल्याचा आरोप पीयूष जैन आणि त्याच्या मुलावर ठेवण्यात आला आहे. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून पीयूष जैन आणि त्याच्या मुलाच्या संपत्तीची तपासणी केली. यानंतर २५७ कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त केली. तसेच सोने, चांदी आणि हिरे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या संपत्तीबाबत अद्याप पीयूष जैन आणि त्याच्या मुलाने समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याचे समजते.

पीयूष जैनच्या कंपनीने तयार केलेल्या समाजवादी अत्तराचे उद्घाटन समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले होते. हा उद्घाटनाचा सोहळा अखिलेश यांनी पक्ष कार्यालयात केला होता. उद्घाटन केल्यानंतर समाजवादी अत्तराचा सुगंध २०२२ मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीनंतर दरवळताना स्पष्ट जाणवेल; असे अखिलेश यांनी सांगितले होते. यानंतर ठोस माहितीआधारे जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीयूष जैन आणि त्याच्या मुलाच्या संपत्तीची तपासणी करण्यासाठी ठिकठिकाणी धाडी टाकल्या. कागदपत्रे छाननीसाठी जप्त केली. यंत्रांच्या मदतीने नोटांची मोजणी करुन त्या जप्त करण्यात आल्या. पीयूष जैन आणि त्याच्या मुलाच्या कारखान्यांमधून तसेच घरांतून जप्त केलेल्या पैसे, सोने, चांदी, हिरे यांच्या बाबत दोघांनीही अद्याप समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याचे समजते.

पीयूष जैन आणि त्याचा मुलगा हे उत्तर प्रदेशमधील मोठे अत्तर व्यावसायिक आहेत. मूळचा कन्नौजचा असलेला पीयूष जैन मागील काही वर्षांपासून कानपूरमध्ये स्थायिक आहे. पीयूष जैनकडून अत्तरांचा मोठा साठा नियमितपणे मुंबईत जातो. मुंबईतून अत्तर आखाती देशांमध्ये जाते. प्रामुख्याने सौदी अरेबियात पीयूष जैनकडून अत्तराची निर्यात केली जाते. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करतेवेळी पीयूष जैनच्या मालकीच्या ४० पेक्षा जास्त कंपन्या असल्याचे आढळले. त्याच्या दोन कंपन्या आखाती देशात आहेत आणि त्याच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे; असेही तपासात आढळून आले. उत्तर प्रदेशमध्ये अत्तर निर्मिती करणाऱ्या पीयूष जैनच्या व्यवसायाचे मुख्यालय मुंबईत आहे. मुंबईत त्याचा एक बंगला पण आहे. पीयूष जैनच्या कन्नौजमधील घरात एक तळघर आढळले तसेच घरात ३०० अशा चाव्या सापडल्या ज्यांच्या कुलुपांचा शोध अद्याप सुरू आहे. पीयूष जैन व्यतिरिक्त उत्तर प्रदेशमधील आणखी एक अत्तर व्यावसायिक रानू मिश्रा याच्याही संपत्तीची चौकशी सुरू आहे.

दरम्यान ज्यांच्या मालमत्तांची तपासणी सुरू आहे त्यांचा समाजवादी पक्षाशी थेट संबंध नाही, असे सपाकडून सांगण्यात आले. मात्र जप्ती सुरू झाल्यानंतर समाजवादी पक्षाने कोरोना संकटाचे कारण देत प्रचाराचे मोठे कार्यक्रम तडकाफडकी रद्द केले.