अनुसूचित जातीच्या महिलांना गरबा खेळण्यापासून रोखले, चौघांविरुद्ध एफआयआर दाखल

0
269

गुजरात,दि.१२(पीसीबी) – गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील एका गावात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या वेळी अनुसूचित जातीच्या दोन महिलांना गरबा नृत्य करण्यास कथितपणे बंद केल्यामुळे तीन पुरुष आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. रविवारी रात्री घटनेची माहिती मिळताच गुजरातचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री प्रदीप परमार यांनी चौकशीचे आदेश दिले आणि वडोदरा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्यास सांगितले.

कथित घटना वडोदरा जिल्ह्यातील सावली पोलीस परिसरातील पिलोल गावात घडली, जिथे अनुसूचित जातीची महिला आणि तिची भाची यांना पंडालमध्ये गरबा नृत्य करण्यापासून रोखण्यात आले. पोलिस उपअधीक्षक एसके वाला यांनी सांगितले की, सोमवारी दाखल केलेल्या एफआयआरनुसार एका उच्च जातीच्या महिलेने दोन दलित महिलांना गरबा करण्यास थांबवले आणि त्यांना पंडाल सोडून जाण्यास सांगितले. आरोपी महिलेने जातीवाचक शेरेबाजी करून दोन्ही महिलांचा अपमान केला.

अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेचा पती घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचला तेव्हा आरोपी महिलेसह छत्रसिंह परमार आणि इतर दोन पुरुषांनीही अपमानास्पद भाषा वापरली आणि तिला जातीवाचक शिवीगाळ केली आणि तिला तिथून निघण्यास भाग पाडले. एसके वाला यांनी सांगितले की, सोमवारी सावली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या विविध कलमांखाली तीन पुरुष आणि एका महिलेविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पिलोल गावात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही.