अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सिंचन घोटाळ्यातील फाईल बंद होणं म्हणजे..- एकनाथ खडसे

0
490

जळगाव, दि.२६ (पीसीबी)- सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करीत असलेल्या राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी याप्रकरणी उघड चौकशीची नऊ प्रकरणे बंद करण्यास मंजुरी दिली. ही सर्व प्रकरणे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित नसल्याचा दावा ‘एसीबी’ने केला असला तरी अजित पवार यांना दिलासा देण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला गेलेला नसून योगायोग असल्याचं म्हटलं आहे. जळगावमधील एका कार्यक्रमात खडसे बोलत होते.

यावेळी एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. “आपल्याला हजारो लोकांचे फोन आले. हजारो लोक भेटून गेले. अनेकांनी आपल्याला नाथाभाऊ तुम्ही आज राजकारणात असता तर युती तुटली नसती. महाराष्ट्रात हे चित्र नसतं. सध्या जे संकट आलं आहे तेदेखील आलं नसतं. समाजाला एक वेगळी दिशा मिळाली असती असं सांगतात,” अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.