अखेर तिसरा कसोटी सामना सिडनीतच रंगणार

0
199

सिडनी, दि.३०(पीसीबी) – ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे या परगण्याच्या सर्व सीमा शेजारील राज्यांनी बंद केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला जाण्यासाठी अडचणी येऊ शकतात. या गोष्टीचा विचार करून तिसरा कसोटी सामना सिडनी ऐवजी मेलबर्न येथेच खेळविण्याचा विचार पुढे येत होता. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा विचार मागे ठेवत सिडनीतच तिसरा सामना खेळविणे पसंत केले.

पहिल्या दोन सामन्यानंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्यामुळे आता मालिकेतील चुरस वाढली आहे. त्यामुळे तिसरा सामना कुठे होणार या विषयाला वेगळे महत्व आले होते. करोनाचे संकट असले, तरी हा सामना सिडनीतच खेळविला जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी दिली.

आम्ही सिडनीतील परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेत आहोत. सिडनीच्या सीमा बंद केल्या असल्या, तरी त्या विषयी आमची चर्चा सुरु आहे. सगळ्या शक्यता पडताळूनच आम्ही तिसरा सामना सिडनीत खेळविण्याचा निर्णय घेतला, असे सांगून हॉकले म्हणाले,’सिडनी मैदानावर खेळविल्या जाणाऱ्या सामन्यांना एक वेगळा इतिहास आहे. येथील सामना हा गुलाबी सामना म्हणून ओळखला जातो. सामन्याचा तिसरा दिवस जेन मॅकग्रा डे म्हणून साजरा केला जातो.’

दरम्यान तिसरा सामना सिडनीत झाल्यास चौथा सामना अन्यत्र खेळविला जाईल अशी चर्चा देखिल सुरू होती. मात्र, हॉकले यांनी ही शक्यताही फेटाळून लावली. चौथा सामना देखील ब्रिस्बेन येथेच सुरक्षित आणि यशस्वी होईल, असे त्यांनी सांगितले.