अंतिम निकालपत्रात माझे नाव असणार; तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असेल – नितेश राणे

0
537

मुंबई, दि २८ (पीसीबी) – न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवल्यामुळे समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत, त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालाच्या अंतिम निकालपत्रात आमदार नितेश राणे यांचेही नाव असणार आहे.

आरक्षणासाठी मराठा समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने विराट मोर्चे काढले. अनेक तरुण हुतात्मा झाले. डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याला विरोध करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. ४२ मराठा आरक्षण मेळाव्यांत सहभाग घेऊन आरक्षणाच्या लढाईचा पाया रचणारे आमदार नितेश राणे यांनी न्यायालयीन लढाईतही सक्रिय सहभाग घेतला आणि न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्यामुळे ते न्यायालयीन लढाईतील एक पक्षकारही आहेत.

आमदार नितेश राणे यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. न्यायालयाच्या आजच्या ऐतिहासिक निकालाचा एक भाग असल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. मराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिकेला विरोध करणारा मी एकमेव आमदार आहे. या निकालाच्या अंतिम निकालपत्रात माझे नाव असणार आहे आणि तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असेल. हे मी माझ्या लोकांसाठी केले आणि शक्य ते करीत राहीन, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.