मुख्यमंत्री माझे राजकीय गुरु असून गुरुदक्षिणा म्हणून अंगठा द्यायलाही तयार – पंकजा मुंडे

0
519

बीड, दि. २७ (पीसीबी) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे राजकीय गुरु असून गुरुदक्षिणा म्हणून अंगठा द्यायलाही तयार आहे असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा धडकली आहे . या सभेत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. तुमचा देवेंद्र ते नरेंद्र हा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत असेही त्या म्हणाल्या .

अनेक वेळी मुलाखतीदरम्यान तुमचा गुरु कोण असे मला विचारले जाते. अशावेळी साहजिकपणे माझे वडील माझे गुरु असल्याचे मी सांगते. पण आज ते नाही आहेत. त्यांच्या पश्चात जर कुणी असेल तर मी सांगते देवेंद्र फडणवीस माझे गुरु आहेत”. “द्रोणाचार्याला अर्जून हा त्याचा प्रिय शिष्य होता. त्याच्यापेक्षा कुणी मोठा होऊ नये यासाठी त्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला. गुरुसाठी अंगठा कापून देण्याच्या परंपरेचे आपण आहोत. मात्र तो अंगठा अर्जुनासाठी होता. तुमच्यासाठी मी एकलव्य होऊन अंगठा द्यायला तयार आहे. पण फक्त तो अर्जुनासाठी असावा दुसऱ्यांसाठी नाही”.अशा शब्दात पंकजा यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपले मते मांडले .

तसेच बीडची माणसे गरीब असली तरी त्यांचे मन मोठे आहे. लोकनेते मुंडे साहेबांवर त्यांनी अतोनात प्रेम केले त्यामुळेच भाजपला भरभरून यश मिळाले आहे, हे कदापि विसरून चालणार नाही. मुंडे साहेबांच्या पश्चात मी रडणार नाही, लढणार अशी शपथ घेतली होती, त्यादृष्टीने मी जनतेच्या भल्यासाठी काम करत असल्याचे त्या म्हणाल्या .