कलाटे यांच्या विरोधात आता शिवसेनेचा कारवाईचा बडगा, हकालपट्टी कऱणार

0
323

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) : चिंचवड पोटनिवडणुकित शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हेच सद्या प्रचाराचा केंद्रबिंदू राहिले आहेत. भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे या उमेदवारांवरचा फोकस कलाटे यांच्यावर गेली आठवडाभर कायम राहिल्याने त्यांच्या उमेदवारीमुळेच आता चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, महाआघाडीत फूट पडल्याच्या बातम्या सुरु झाल्याने आता शिवसेनेने कलाटे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर पक्ष एक,दोन दिवसांत कारवाई करणार असल्याचे या पक्षाचे उपनेते आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी सांगितले आहे.

त्याअगोदर दुपारी `सरकारनामा`ने पक्षादेश न पाळल्याने कलाटेंवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाल्याची बातमी व्हायरल केली होती. ती काही तासांतच खरी ठरली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत मनधरणी करूनही काल दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत कलाटे यांनी आपली उमेदवारी मागे न घेतल्याने तातडीने सायंकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

त्यानंतर अहिर यांनी बंडखोर कलाटेंवर कारवाई होणार असल्याचे सांगितले.पक्षाशी त्यांचा सबंध राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांना साथ देणाऱ्या नगरसेवकांवर,मात्र लगेच कारवाई न करता ती खातरजमा करून केली जाईल,असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाईल.त्यानंतरही त्यांनी कलाटेंना साथ दिली, तर आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत त्यांना तिकिट दिले जाणार नाही,असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान,चिंचवडची निवडणूक ही भाजप विरुद्ध आघाडी अशी दुरंगी होणार असून येथे विजयाचा आम्हाला आत्मविश्वास (कॉन्फीडन्स) आहे.अतिआत्मविश्वास नाही, असे सचिन अहिर म्हणाले. आघाडीच्या उमेदवाराच्या (राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना काटे) प्रचारार्थ शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा रोड शो चिंचवडला पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच गरज वाटली,तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाची मुलूखमैदान तोफ संजय राऊत यांना सुद्धा चिंचवडच्या प्रचाराला बोलवू,असे ते म्हणाले. गतवेळी २०१९ ला कलाटे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने त्यांना लाखभर मते मिळाली होती. ती त्यांची वैयक्तिक नव्हती, तर पक्षाची होती. ती यावेळी त्यांना मिळणार नाहीत. परिणामी ही लढत भाजप विरुद्ध आघाडी अशीच होईल,असे ते म्हणाले.