“प्रकाश आंबेडकरांचा नाद सोडा, त्यांच्यावर अवलंबून न राहता कामाला लागा,” – सोनिया गांधी

0
776

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीमुळे बसलेल्या मोठ्या धक्क्यामुळे चिंतेत असलेले काँग्रेसचे नेते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचितने सोबत यावे, यासाठी मोठे प्रयत्न केले. कॉंग्रेसच्या प्रदेशपातळीवरील नेत्यांनी प्रकाश आंबडेकरांचे मनपरिवर्तन करण्यासाठी आंबेडकरांच्या घरी चकरा मारल्या. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही.  शेवटी नेत्यांनी चालविलेल्या मिन्नतवाऱ्यांमुळे संतप्त झालेल्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी, “आंबेडकरांचा नाद सोडा, त्यांच्यावर अवलंबून न राहता कामाला लागा,” अशा शब्दांत नेत्यांना खडसावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतर राज्यपातळीवरील काही नेत्यांनी तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधींसमोर झालेल्या आढावा बैठकीत या पराभवाला प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी जबाबदार असल्याचे सांगितले होते. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांची टक्केवारी बघता लोकसभेच्या सुमारे डझनभर जागा केवळ ‘वंचित’च्या उमेदवारांमुळेच गमवाव्या लागल्याचे रडगाणेही या नेत्यांनी गायले होते.

त्यावर, “वंचित’वर खापर फोडण्याऐवजी कॉंग्रेसला जनतेने का स्वीकारले नाही? याचा विचार करा, असे राहुल गांधींनी फटकारले होते. तसेच अशा संभाव्य आघाडीची शक्‍यताही फेटाळून लावली होती. दुसरीकडे, सोनिया गांधींनी कॉंग्रेसमधीलच दलित आणि अल्पसंख्याक नेत्यांना पुढे आणण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.