गणित विधानसभेचे : मावळात सुनील शेळके असणार राष्ट्रवादीचे उमेदवार?

0
1272

मावळ, दि. २५ (पीसीबी) – मावळ विधानसभा मतदारसंघात यंदा मोठी राजकीय उलथापालथ होणार असून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडखोरी होण्याची शक्‍यता आहे. भाजपच्या दुसऱ्या फळीतील धडाडीचे कार्यकर्ते सुनील शेळके हे मावळमधून इच्छुक असून त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. मात्र, राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे यांना डावलून शेळके यांना उमेदवारी मिळण्याची शकता कमी आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

मावळमध्ये दोन वेळा आमदार राहिलेले बाळासाहेब भेगडे यांना मंत्रिपद मिळाल्याने तालुक्‍यात त्यांचे मोठे वर्चस्व निर्माण झाले आहे. मात्र, त्यांचे निकटवर्ती असलेले सुनील शेळके यांनाही आमदारकीचे वेध लागले आहे. त्यामुळे त्यांनी दंड थोपटले असून त्यांची प्रचार यात्रा गावोगाव फिरत आहे. ग्रामस्थांच्या भेटीबरोबरच ग्रामदैवताचे दर्शन असा त्यांचा कार्यक्रम आहे. सोशल मीडीयावरही ते सक्रिय असून बहुसंख्य निष्ठावंत कार्यकर्ते त्यांनी जोडले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच लोकांची अनेक कामे त्यांनी वैयक्तिक स्तरावर केली आहेत. तसेच ते तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्षही आहे.

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे गटाचे कार्यकर्ते असलेले शेळके सध्या कमळाच्या चिन्हासह प्रचार करत असले तरी थोड्याच दिवसात त्यांच्या हाती घड्याळ येऊ शकते. मात्र, राष्ट्रवादी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना डावलून त्यांना उमेदवारी देईल का, हे आगामी काळच ठरवेल.

दरम्यान, शेळके यांना राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विरोध असून पक्षाने आयात उमेदवाराला तिकीट दिल्यास पक्षविरोधी भूमिका घेऊ, असा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागे घेतला होता. बापूसाहेब भेगडे व बाळासाहेब नेवाळे या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांचेही गावोगाव प्रचार सुरू आहेत. मात्र, राष्ट्रवादीतील एक गट सुनील शेळके यांच्या संपर्कात असल्याचेही चर्चा आहे.

शेळके राष्ट्रवादीचे नव्हे, तर भाजपचे उमेदवार

शेळके यांची वाढती लोकप्रियता पाहुन कोणताही पक्ष त्यांना उमेदवारी देईल यात शंका नाही. मात्र, शेळके यांची पाचवी पिढी भाजपबरोबर एकनिष्ठ आहे. तसेच मावळातील भाजपचे अनेक पदाधिकारी शेळके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असून त्यांच्यात निवडून येण्याची धमक आहे. भाजपने तिकीट वाटप करताना स्थानिक स्तरावर सर्व्ह केल्यास शेळके यांच्याबाबत जनसामान्यांचा कल कळेल. भाजपकडून त्यांना नक्कीच न्याय मिळणार असून तेच भाजपचे उमेदवार असतील. असा विश्वास शेळके यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.