राज्यकर्त्यांच्या मनाला पाझर फुटत नाही का ? – अमोल कोल्हेचा संतप्त सवाल

0
405

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – ब्रम्हनाळच्या दुर्दैवी घटनेतील मन हेलावून टाकणारा एक फोटो समोर आला. या दुर्घटनेत माय-लेकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे एकमेकांना बिलगलेले मृतदेह फोटोमध्ये दिसतात. हा फोटो पाहून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. पण राज्यकर्त्यांच्या मनाला पाझर फुटत नाही का ? असा संतप्त सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

पुराच्या पाण्यात एक बोट उलटल्याची मोठी दूर्घटना सांगलीत घडली आहे. सांगलीमधील पलूस तालुक्यात ही घटना घडली आहे. या बोटमध्ये २५ ते ३० जण प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान ही बोट बुडाली. बोट बुडाल्याने अनेकजण बुडाले आहेत. सांगलीतील ब्रह्मनाळ येथे नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित नेण्याचे काम सुरु होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही बोटीतील काही नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. ही बोट खाजगी होती अशी माहिती समोर येत आहे. बोट नेमकी कशी उलटली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. या बोटीत एक आजी आणि चिमुरडीही होती. काळाने घाला घातला आणि यात आजी आणि चिमुरडीचा अंत झाला. आता यावरून सरकारवर चौफेर टीका होत आहे.