#DhoniKeepTheGlove: ‘हा तर शूरवीरांचा सन्मान’, रितेशचा धोनीला पाठिंबा

0
444

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी)- विश्वचषकातील भारताच्या सामन्यात यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने पॅरा कमांडोच्या पॅराशूट युनिटकडे असलेले विशेष ‘बलिदान’ चिन्ह असलेले गोव्ह्ज वापरले होते. सध्या देशभरात याच ग्लोव्ह्जचा विषय चर्चेत आहे. कारण ग्लोव्ह्जवरील हे चिन्ह काढून टाकावे असे आदेश आयसीसी कडून बीसीसीआय ला देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे भारतीयांनी याला विरोध केला आहे. सोशल मीडियावर #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग खूप ट्रेण्ड होत आहे. बॉलिवूड कलाकारांनीही धोनीला पाठिंबा दिला आहे. अभिनेता रितेश देशमुखनेही यासंदर्भात ट्विट करत धोनीला पाठिंबा दर्शविला आहे.

‘कोणताही राजकीय पक्ष सत्तेत असला तरी भारतीय सैन्य नेहमीच स्वतंत्र राहिले आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीने अभिमानाचं प्रतिक म्हणून ‘बलिदान’ चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरले होते. यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जात नसून हा तर शूरवीरांचा सन्मान आहे,’ असे म्हणत रितेशने #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग वापरला.

धोनीने आपल्या देशाच्या सैन्याप्रती दाखवलेले हे प्रेम असून त्यात काहीच चूक नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे धोनीने आयसीसीच्या नाकावर टिच्चून पुढील सामन्यांमध्येही हे सन्मानचिन्ह असणारे ग्लोव्ह्ज वापरावेत असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.