अबब..तीन वयस्कर महिलांना कोरोनाऐवजी दिली चक्क रेबीजची लस

0
236

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – देशात लसीकरण मोहीम सुरु असताना आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा दर्शवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वयस्कर महिलांना करोनाऐवजी रेबीजची लस देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. लस दिल्यानंतर एका महिलेची प्रकृती प्रचंड बिघडली. यानंतर तिच्या नातेवाईकांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याकडे यासंबंधी तक्रार केली असता ही घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशात ही घटना घडली आहे.

केंद्र आणि राज्य सरकार वारंवार पात्र लोकांना लस घेण्याचं आवाहन करत आहे. एकीकडे लसीकरणासाठी केंद्रांबाहेर लोक रांगा लावत असताना उत्तर प्रदेशातील या घटनेनंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

शामली येथील आरोग्य केंद्रात सरोज (७०), अनारकली (७२) आणि सत्यवती (६०) या लसीकरणासाठी पोहोचल्या होत्या. करोना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी त्या पोहोचल्या असता तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेरुन प्रत्येकी १० रुपयांचं इंजेक्शन घेऊन येण्यास सांगितलं. यानंतर त्यांना करोनाऐवजी चक्क रेबीजची लस देण्यात आली.

तिन्ही महिला अशिक्षित आहेत. लस घेतल्यानंतर त्या घरी पोहोचल्या. यावेळी एका महिलेची प्रकृती बिघडली. नातेवाईकांनी महिलेला खासगी डॉक्टरकडे नेलं असता आरोग्य केंद्राने लस दिल्यानंतर दिलेलं प्रिस्क्रिप्शन पाहून त्यांना धक्का बसला. यावेळी डॉक्टरांनी त्यांना महिलेला रेबीजची लस दिली असल्याचं नातेवाईकांना सांगितलं.