हिंजवडी आयटी पार्कमध्ये २५० ग्रॅम एमडी विक्रीचा डाव उधळलाराजस्थानच्या तरुणासह दोघे गजाआडसाडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

PCB Admin
2 Min Read

पिंपरी, दि. १५ – हिंजवडी आय टी पार्क परिसरात मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या राजस्थानमधील तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले. विनोदे कॉर्नर येथे सापळा रचून केलेल्या या कारवाईत २४९ ग्रॅम एमडीसह कार आणि दोन मोबाईल असा एकूण १३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीच्या पुण्यातील रविवार पेठेतील आणखी एका साथीदाराला अटक केली आहे.

प्रेमेंद्र सिंह पिता भेरू सिंह (वय ३१, रा. खुडाला फालना, जि. पाली, राजस्थान) आणि दिनेश कुमार मगराम चौधरी (वय २८, रा. फडके हौद चौक, रविवार पेठ, पुणे, मूळ – राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला ८ ऑक्टोबर रोजी विनोदे कॉर्नर परिसरात एक तरुण एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून संशयिताच्या हालचालींवर नजर ठेवली. प्रेमेंद्र सिंह हा कार मधून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता त्यामध्ये १२ लाख ४५ हजार रुपये किमतीचा एमडी साठा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करून आरोपीची चौकशी सुरू केली.
चौकशीदरम्यान या व्यवहारात दिनेश चौधरी याचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी त्याचा माग काढून पुण्यातून अटक केली. दोघेही मूळचे राजस्थानमधील एकाच भागातील आहेत. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.
हिंजवडी परिसरात आयटी कंपन्या आणि निवासी संकुलांची मोठी संख्या आहे. त्यामुळे आरोपींनी एमडीचा साठा कोठून आणला, त्याची विक्री कोणाला होणार होती आणि यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारचे व्यवहार केले आहेत का, याबाबत पोलीस सखोल तपास करणार आहेत. या प्रकरणात आयटी कर्मचाऱ्यांचा सहभाग किंवा त्यांना अमली पदार्थ विक्री झाल्याचे अद्याप निष्पन्न झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, वसंतराव तेली, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, सोमनाथ पांचाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share This Article