पिंपरी चिंचवड शहरातील इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष तसेच विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शहरातील इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. यावेळी केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
देशातील लोकशाही व्यवस्था अधिक बळकट राहावी, निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात विश्वास कायम राहावा आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता व निष्पक्षता जपली जावी, या मुद्द्यांवर आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून,आयोगाच्या कामकाजाबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानातील लोकशाही, समता आणि न्याय या मूल्यांचे जतन करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने आवाज उठवणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
इंडिया आघाडी आणि पुरोगामी संघटनांच्या या धरणे आंदोलनातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. केंद्र सरकारने या मागणीची दखल घेऊन देशातील लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आवश्यक भूमिका घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचे धरणे आंदोलन

