पिंपरी चिंचवड मसपा कार्यकारणी बेकायदा रद्द करा – आजीव सदस्यांची जोरदार मागणी

PCB Admin
4 Min Read

पिंपरी, दि. १२ – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेची निवडणूक २९ ऑगस्ट रोजी बिनविरोध झाली. मात्र, या कार्यकारिणीवर आणि निवडणूक प्रक्रियेवरच काही आजीव सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. लोकशाही तत्त्वांना धरून निवडणूक झालेली नसल्याने या प्रक्रियेची सखोल चौकशी करावी. घोषित केलेली कार्यकारिणी रद्द करावी आणि चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मसापचे पुणे जिल्हा प्रतिनिधी व शाखाध्यक्षांकडे आजीव सदस्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. यात दोघांकडून विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे मिळाली नाहीत. नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवडली गेल्याचे समाजमाध्यमांतून समजले. सर्व आजीव सभासदांच्या सहभागातून निवडणूक पारदर्शकपणे झालेली नाही. विद्यमान अध्यक्ष राजन लाखे यांचीच पुन्हा निवड होईल अशा पद्धतीने सोयीस्कर प्रक्रिया राबविली गेली, आदी आक्षेपांचा समावेश आहे.
सदस्यांचा आक्षेप –

  • सुमारे ७५ ते ८० टक्के आजीव सभासदांना सभा व निवडणुकीची आगाऊ सूचना नाही
  • मोजक्या व निवडक आजीव सभासदांना बोलावून कार्यकारिणी बिनविरोध निवडल्याचा बनाव
  • घेतलेली सभा लोकशाही व सर्वांना समान संधी न देण्याच्या विरोधात
  • निवडणुकीसंदर्भातली जाहीर सूचना नाही
  • मध्यवर्ती शाखेकडून निवडणूक अधिकारी नियुक्तीचे पत्र मिळाले नाही

सदस्यांनी विचारलेले प्रश्‍न

  • निवडणूक घेण्याचा निर्णय, कधी व कोणत्या सभेत घेतला गेला?
  • निवडणूक सूचना सर्व आजीव सभासदांना कशी व कधी दिली?
  • नामनिर्देशन अर्ज सर्व इच्छुकांना उपलब्ध होते का?, मुदत होती का?
  • किती अर्ज आले?, किती वैध ठरले?, किती मागे घेतले?
  • एकाच व्यक्तीकडे अनेक पदे आणि कुटुंबीयांचा समावेश कसा?

सदस्यांच्या मागण्या

  • २९ ऑगस्ट २०२६ च्या सभेपासूनच्या सर्व प्रक्रियेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी व्हावी
  • चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यकारिणी वैधतेबाबत अंतिम निर्णय घेऊ नये
  • निवडणुकीत सहभागी सर्वांसह त्यांना सहकार्य करणाऱ्या इतरांचेही आजीव सदस्यत्व रद्द करावे
  • निवडणूक कार्यक्रमास उपस्थितांची यादी, निरीक्षक नियुक्ती ठराव, नियुक्तीपत्र उपलब्ध करावे
  • निवडणूक अधिकारी व संबंधित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती मध्यवर्ती शाखेने केल्याचे पत्र द्यावे

‘मसाप’ शाखेचे उत्तर…
मसापची २९ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत झालेली कार्यकारिणी निवड पुण्याचे कार्यवाह सुनील महाजन यांच्या निरीक्षणाखाली घटनेच्या नियमानुसार झाली आहे. ही सभा पुणे जिल्हा प्रमुख प्रभाकर ओव्हाळ यांच्या उपस्थितीत झाली आहे. निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी नियमानुसार राबविली आहे. त्याबाबतची माहिती त्यांच्याकडून घेणे उचित ठरेल, असे लेखी उत्तर मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे कार्यवाह संजय जगताप यांनी आजीव सदस्यांना दिले आहे.

मसापच्या पिंपरी चिंचवड शाखा कार्यकारिणी निवडणुकीबाबत काय झाले? कशी निवडणूक झाली? ते पहावे लागले. निवड प्रक्रिया समजून घेऊन निर्णय घेतला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ. अध्यक्ष बाहेरगावी आहेत. ते येताच या बाबतीत बैठक घेऊ आणि योग्य ती कार्यवाही करू, असे मसपाचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्पष्ट केले.

आजीव सदस्य आक्रमक…

मसाप शाखेमध्ये एकाधिकारशाही अनेक वर्षांपासून सुरू आहे. नवीन स्वयंघोषित कार्यकारिणी नियमबाह्य आहे. केंद्रीय शाखा अध्यक्षांची अनुमती कार्यकारिणीला मिळाल्याचा कुठलाही पुरावा नाही अशी माहिती लेखक आणि व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी म्हटले आहे.

मसापसारख्या गौरवशाली संस्थेत घडणाऱ्या प्रकारांवर मौन बाळगणे म्हणजे मूल्यांच्या ऱ्हासाला मूक संमती देण्यासारखे आहे. इतरही साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी या गैरप्रकाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असे प्रकाश निर्मळ यांनी सांगितले.

आदराने पाहिल्या जाणाऱ्या मसाप सारख्या संस्थेमध्येच मूल्यांची पायमल्ली होत आहे. बहुसंख्य आजीव सदस्यांना सभेबद्दल आणि कामकाजाबद्दल जाणीवपूर्वक माहिती दिली जात नाही, असे सुहास पोफळे यांनी सांगितले.

सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी कार्यरत होताना कोणती महत्त्वाची तथ्ये पाळायला हवीत. तिथल्या कामाची पद्धती आदर्श असायला हवी, असे जेष्ठ साहितयिक प्रा. तुकाराम पाटील यांनी म्हटले आहे.

मसाप पिंपरी चिंचवड शाखेची झालेली निवडणूक बेकायदेशीर आहे. अनेक साहित्यिक सदस्यांना निवडणुकीविषयी काही माहिती नव्हती. त्यामुळे ही निवडणूक रद्द व्हायला हवी आणि पुन्हा घ्यावी, असे कवी सुरेश कंक यांनी सांगितले.

मसापचे शहरात सुमारे ९०० आजीव सभासद आहेत. सर्वांना कार्य अहवाल व जमा खर्च तपशील पाठवला नाही. ठराविक लोकांना मॅसेज पाठवून बोलावून घेतले आणि निवडणूक झाली व आम्ही निवडून आलो असे जाहीर केले, असे राज अहेरराव यांनी म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड मसाप सभासदांनो वेळीच जागे व्हा! अजूनही वेळ गेलेली नाही. सदसद्विवेकबुद्धीला स्मरून अन्यायाविरुद्ध खंबीरपणे लढू, असा विश्वास लेखक संदीप तापकीर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Share This Article