उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’त ‘फॅसिलिटेशन सेंटर’; परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ होणार!

PCB Admin
2 Min Read
  • औद्योगिक प्रस्तावांच्या कार्यवाहीला गती देण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचा निर्णय
  • औद्योगिक संघटनांसोबतच्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा

पुणे, दि. १३ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील औद्योगिक विकासाला गती देण्यासह उद्योजकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या वतीने विशेष ‘फॅसिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे औद्योगिक प्रस्तावांवरील कार्यवाही अधिक गतिमान, सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.

डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ‘पीएमआरडीए’च्या आकुर्डी येथील मुख्यालयात औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंगळवारी (दि. १३) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, संबंधित विभागांचे प्रमुख व अधिकारी, तसेच चाकण, हिंजवडी, रांजणगाव, तळेगाव, पिरंगुट आणि इतर औद्योगिक क्षेत्रांतील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विकास परवानगी, फायर एनओसी, बीपीएमएस प्रणालीतील अडचणी, शुल्क आकारणी, आवश्यक कागदपत्रे, झोनिंग ओपिनियन आणि विविध प्रलंबित औद्योगिक प्रस्तावांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. औद्योगिक प्रस्तावांवरील कार्यवाही अधिक पारदर्शक करण्यासाठी १०० टक्के ऑनलाइन बीपीएमएस प्रणालीद्वारेच प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. बीपीएमएस प्रक्रियेदरम्यान उद्योजक आणि वास्तुविशारदांना येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे अधिकारी आणि बीपीएमएस प्रतिनिधी यांच्या समन्वयातून ‘फॅसिलिटेशन सेंटर’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच, शुल्काचा तपशील, आवश्यक कागदपत्रांची यादी आणि इतर महत्त्वाची माहिती औद्योगिक संघटनांना उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही महानगर आयुक्तांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

औद्योगिक क्षेत्रांतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव याकडे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. प्राधान्याने सुधारणा करावयाच्या रस्त्यांची यादी औद्योगिक संघटनांकडून मागविण्यात आली आहे. तसेच, अवजड वाहनांसाठी ‘ट्रक टर्मिनस’ उभारणे आणि औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागा निश्चित करण्याचे निर्देशही महानगर आयुक्तांनी या बैठकीत दिले.

‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील औद्योगिक विकासाला चालना देणे, उद्योजकांना अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे आणि परवानगी प्रक्रिया अधिक जलद, सुलभ व पारदर्शक करणे हा ‘पीएमआरडीए’चा उद्देश आहे. ‘फॅसिलिटेशन सेंटर’च्या माध्यमातून उद्योजकांच्या प्रश्नांचे प्रभावी निराकरण होऊन औद्योगिक क्षेत्रातील विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.

Share This Article