मुंबई दि. ९ – राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
दरम्यान स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाचा पद्मविभूषण (मरणोत्तर) पुरस्कारासाठीचा शिफारस प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्यावतीने केंद्रसरकारकडे तातडीने पाठवण्यात यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातात आपण महाराष्ट्राचे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना गमावले. ही महाराष्ट्राची आणि देशाची न भरून निघणारी हानी आहे. अजितदादांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासाला एक नवी दिशा दिली. एक कणखर प्रशासक, अहोरात्र कष्ट करणारे लोकप्रतिनिधी आणि ‘अॅक्शन ओरिएंटेड’ नेते म्हणून त्यांनी जनमानसावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या या महान राष्ट्रसेवेचा आणि नेतृत्वाचा यथोचित सर्वोच्च गौरव म्हणून त्यांना भारत सरकारचा अत्यंत मानाचा पद्मविभूषण (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर व्हावा ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची आणि आमची तीव्र भावना आहे असेही चेतन तुपे यांनी म्हटले आहे.
या निवेदनात राष्ट्रीय नेतृत्व आणि पक्ष संघटना, प्रशसानावरील पकड आणि विकास, शेतकरी आणि सहकार क्षेत्राचे आधारस्तंभ, जनकल्याणाच्या योजना आदी अजितदादांच्या लोकसेवेतील ठळक पैलू मांडण्यात आले आहेत.
अजितदादांचे अचानक जाणे हे एका युगाचा अंत झाल्यासारखे आहे. अशा महान लोकनेत्याच्या अथांग परिश्रमांचा, दूरदृष्टीचा आणि जनसेवेचा मरणोत्तर सर्वोच्च सन्मान होणे हे संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद ठरेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विधानमंडळ सदस्य उपस्थित होते.

