वारकरी बांधवांना शहरात आवश्यक त्या सोईसुविधा देण्यात याव्यात,वारकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी टेहळणी टाॅवर उभारावेत – महापौर रवि लांडगे
पिंपरी, दि. ३(पीसीबी) – आषाढी एकादशीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून मोठ्या संख्येने वारकरी, भाविक आणि नागरिक मार्गस्थ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील सर्व नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सेवा, आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा यंत्रणेच्या अद्ययावत ठेवून वारकरी बांधवांना आवश्यक त्या सोईसुविधा देण्यात याव्यात असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज सकाळी मॅगझीन चौक व भक्ती शक्ती चौक,निगडी येथील पालखी मार्गाची पाहणी केली.त्यांचे समवेत अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,सह शहर अभियंता बापू गायकवाड ,उप आयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,निवेदीता घार्गे, कार्यकारी अभियंता शिवाजी चौरे, दमयंती पवार,चंद्रकांत मुथाळ, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत, वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन व इतर संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाहणी दौऱ्याची सुरुवात सकाळी ८ वाजता मॅगझिन चौक येथून करण्यात आली. त्यानंतर भक्ती-शक्ती चौक येथे विविध विभागांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापौरांनी पालखी मार्गावरील स्वच्छता, रस्त्यांची स्थिती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चलत शौचालये, आरोग्य पथके, रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा, वाहतूक नियोजन, प्रकाश व्यवस्था, दिशादर्शक फलक तसेच वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सोईसुविधांचा आढावा घेतला.
महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली सुविधांची सविस्तर माहिती घेतली.
महापौर रवि लांडगे यांनी पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचा अमूल्य वारसा असल्याचे सांगत, वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्या. वारकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी टेहळणी टाॅवर उभारावेत,पालखी मार्गावरील स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन सेवा आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.तसेच, पालखी मार्गावरील सर्व सुविधा अखंडित सुरू ठेवून वारकऱ्यांच्या सूचना व अडचणींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करत स्वच्छता राखावी, वाहतुकीच्या सूचनांचे पालन करावे आणि पालखी सोहळा शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही महापौरांनी केले..

