दि.२५(पीसीबी)-जालन्याच्या बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत 7.31 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
राज्यात यापूर्वे देखील काही बँकांमध्ये घोटाळा झाल्याची प्रकरणं घडली आहे. या बँकांवर आरबीआयकडून कारवाई देखील करण्यात आली. बँकेत घोटाळा झाल्यास ठेवीदारांची चिंता वाढते, काही प्रकरणात तर आरबीआयने कारवाई केल्यामुळे अनेक ठेवीदारांना आपल्याच हक्काचे पैसे मिळण्यासाठी देखील अनेक महिने वाट पहावी लागते. यामुळे ठेवीदारांची मोठी गौरसोय होते. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये काही बँका आणि पतसंस्थांमध्ये मोठे घोटाळे झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान त्यानंतर आता अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना समोर येताच ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जालन्याच्या बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत 7.31 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोने ठेवून 7 कोटी 31 लाख रुपयांची बँकेची फसवणूक करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बदनापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी बँक मॅनेजर आणि सुवर्णकाराला ताब्यात घेण्यात आलं आहे, तर आणखी एक जण फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.











































