या ‘भोंदू’ बाबावर महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी

1 Min Read

छत्रपती शिवाजी महाराज थकले होते आणि त्यांनी राजपाट समर्थांकडे दिला,” बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या विधानाचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या वक्तव्याचा अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला असून, या ‘भोंदू’ बाबावर महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महापुरुषांचा अपमान करण्याचा एककलमी कार्यक्रम

रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “हे वक्तव्य केवळ चुकीचे नसून अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि आपल्या समृद्ध संत परंपरेबद्दल गरळ ओकली होती. वारंवार अशी विधाने करून छत्रपतींचा इतिहास आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावण्याचा, तसेच महापुरुषांचे महत्त्व कमी करण्याचा हा कोणताही ‘एककलमी कार्यक्रम’ तर नाही ना? अशी शंका येते.”

सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीवर ओढले ताशेरे

ज्या कार्यक्रमात हे वक्तव्य झाले, तिथे राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते, यावरून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला. “शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्याचे राज्यकर्ते त्याच मंचावर उपस्थित होते, याचे जास्त दुःख वाटते,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Share This Article