दि.१५(पीसीबी)-राज्याच्या सत्तेचं केंद्र असलेल्या मंत्रालयावर संभाव्य दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आली आहे. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता मंत्रालयाला पोलिसांच्या अत्यंत प्रशिक्षित ‘एलिट गार्ड’ कमांडोंचे अभेद्य संरक्षण कवच देण्यात आले आहे. अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले हे कमांडो प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
मुख्य प्रवेशद्वार आणि गार्डन गेटवर तैनात असलेले कमांडो एके-47 रायफलसह पूर्ण सज्ज अवस्थेत असून, त्यांच्या नजरा प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तीवर खिळलेल्या आहेत. संशयास्पद हालचालींवर तत्काळ कारवाई करण्यासाठी त्यांना विशेष आदेश देण्यात आले आहेत. मंत्रालयाला यापूर्वीच तिहेरी सुरक्षा कवच देण्यात आले होते, मात्र आता ‘एलिट गार्ड’च्या तैनातीमुळे सुरक्षा व्यवस्थेत आणखी बळकटी आली आहे.
‘एलिट गार्ड’ म्हणजे काय?
‘एलिट गार्ड’ ही पोलीस दलातील विशेष प्रशिक्षित कमांडो फोर्स असून त्यांचा वापर दहशतवादी हल्ले परतवून लावणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि उच्चस्तरीय गुप्त मोहिमा यासाठी केला जातो. या कमांडोंना अत्यंत कठोर प्रशिक्षण देण्यात आलेले असते. मंत्रालयात आता ही फोर्स कायमस्वरूपी तैनात करण्यात आली आहे.
ATS ची मोठी कारवाई वाराणसीत छापेमारी
दरम्यान, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे मोठी कारवाई केली आहे. आदमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पठाणी टोला परिसरात ATS ने छापेमारी करत दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याचा संशय असलेल्या व्यक्तींवर कारवाई केली.या कारवाईत डॉ. आरिफ अन्सारी आणि त्यांचा मुलगा अबू बक्र यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या घराची सखोल झडती घेण्यात आली असून, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे ATS ने जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
प्राथमिक तपासात हवाला व्यवहार, परदेशातून येणारा निधी आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार यांचा तपास सुरू आहे. तसेच संबंधित व्यक्तींचे बँक व्यवहार, डिजिटल ट्रान्झॅक्शन आणि संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली जात आहे. बंदी घातलेल्या संघटनांशी कोणताही संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.ही कारवाई महाराष्ट्र ATS आणि वाराणसी ATS यांच्या संयुक्त पथकाने केल्याचे समोर आले आहे.मुंबईसह राज्यातील महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंत्रालयावर संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने कोणतीही जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला असून, संपूर्ण यंत्रणा सतर्क मोडवर ठेवण्यात आली आहे. एकूणच, मंत्रालयावरील संभाव्य धोका आणि ATS च्या कारवायांमुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर चित्र समोर आले असून, पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.












































