MPSC परीक्षेत निवड न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाची “निपुण सेतू” योजना लागू;जाणून घ्या सविस्तर

1 Min Read

दि.१५(पीसीबी)-राज्यातील एमपीएससी परीक्षेला अधिक पारदर्शक, गतीमान आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त बनवण्यासाठी राज्य सरकारने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSCच्या धर्तीवर महाराष्ट्रातही “निपुण सेतू” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला जाणार आहे.या निर्णयामुळे एमपीएससीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या विभागांसाठी स्वतंत्र परीक्षा द्यावी लागत होती, मात्र आता एकदाच परीक्षा दिल्यानंतर विविध विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

पूर्वी एमपीएससीकडून ५३ संवर्गांसाठी परीक्षा घेतली जात होती, मात्र आता ही संख्या वाढवून १०३ संवर्ग करण्यात आली आहे. यामुळे अधिक पदांसाठी संधी निर्माण होणार असून उमेदवारांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचणार आहेत.

यासोबतच, एका विभागासाठी परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्या विभागासाठी पुन्हा परीक्षा देण्याची गरज राहणार नाही. वेटिंग लिस्टच्या माध्यमातून उमेदवारांना विविध विभागांमध्ये संधी दिली जाणार आहे.

यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांनाही आता निराश व्हावे लागणार नाही. “निपुण सेतू” पोर्टलद्वारे अशा उमेदवारांची माहिती सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातही या उमेदवारांना नोकरीच्या नव्या संधी मिळणार आहेत.

हा उपक्रम महाजॉब्स पोर्टल अंतर्गत राबवला जाणार असून, यामुळे सरकारीच नव्हे तर खासगी क्षेत्रातही रोजगाराच्या दार उघडणार आहेत.या महत्त्वाच्या निर्णयामुळे एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना मोठा फायदा होणार असून, त्यांच्या करिअरला एक नवी दिशा मिळणार आहे.

 

Share This Article