राज्यात उष्णतेचा कहर ‘या’ 15 जिल्ह्यांना गंभीर इशारा

2 Min Read

दि.१५ (पीसीबी) – राज्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत ही उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढली असली तरी विदर्भात परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. अकोला येथे तब्बल 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे यंदाच्या हंगामातीलच नव्हे तर देशातीलही सर्वाधिक तापमान ठरले आहे. अमरावती आणि वर्धा येथे तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचले, तर नागपूर, चंद्रपूर, वाशिम आणि गडचिरोली येथेही पारा 41 अंशांवर गेला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उष्णतेचा तडाखा कायम असून जळगाव, धुळे, सोलापूर आणि परभणी येथे तापमान 41 अंशांच्या पुढे गेले आहे. बिहार ते तामिळनाडू दरम्यान तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उष्णतेत वाढ होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, कोकण किनारपट्टीवर उकाडा आणि आर्द्रतेचा दुहेरी त्रास जाणवत असून ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही पावले उचलली आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे (SOPs) लागू करण्यात आल्याची माहिती दिली आहे.लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड

नागरिकांसाठी सूचना

दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणे टाळा
भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा
हलके व सैल कपडे वापरा
गरज असल्यासच घराबाहेर पडा

राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले असून, सर्वांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article