नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्याशिवाय फेटा काढणार नाही म्हणणारे भाजपचे सम्राट होणार मुख्यमंत्री?

0
4

दि.१४-(पीसीबी) – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यांनी राज्यसभेच्या खासदार पदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जागी भाजपचा मुख्यमंत्री होणार असून नितीश यांच्या JDU ला दोन उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहेत. रिक्त झालेल्या मुख्यमंत्री पदासाठी सर्वात जास्त चर्चा आहे ती एकाच नावाची, ती म्हणजे बिहारचे उपमुख्यमंत्री भाजप नेते सम्राट चौधरी यांची. सम्राट चौधरी यांच्या घराची सुरक्षा सुध्दा वाढवण्यात आली आहे. पण ह्याच सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी काही वर्षांपूर्वी डोक्यावर फेटा बांधला होता आणि जोपर्यंत नितीश कुमार यांना हटवणार नाही तोपर्यंत डोक्यावरी फेटा काढणार नाही अशी खुनगाठ बांधली होती.

2022 विधानसभा निकालानंतर नितीश कुमार यांनी भाजपला धोका देत, NDA सोबतची युती तोडली आणि लालू यादव यांच्या RJD सोबत सत्तास्थापन केली. ह्यानंतर भाजपने दिल्लीत एक बैठक बोलावली आणि सम्राट चौधरी यांच्यावर विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेता पदाची जबाबदारी दिली, त्यावेळी सम्राट चौधरी यांनी जोपर्यंत धोका देणाऱ्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवणार नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्यावरील फेटा हटवणार नाही, अशी जगजाहीर शपथ घेतली होती.

जानेवारी 2024 मध्ये राजकीय समीकरणे पुन्हा बदलली आणि नितीश कुमार यांनी महागठबंधन सोडून पुन्हा भाजपच्या (NDA) पाठिंब्याने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नितीश कुमार यांनी जुनी आघाडी सोडून भाजपसोबत आल्यामुळे सम्राट चौधरी यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण झाल्याचे मानले. पुढे जुलै 2024 मध्ये सम्राट चौधरी अयोध्येला गेले. तिथे त्यांनी शरयू नदीत पवित्र स्नान केले आणि आपले डोके मुंडण करून तो फेटा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केला. अशा प्रकारे तब्बल 22 महिन्यांनंतर त्यांनी आपल्या डोक्यावरील फेटा उतरवाल.

नितीश कुमार यांच्या विरोधात फेटा घालण्यापासून असेल किंवा नितीश कुमार सोबत आल्यानंतर फेटा काढण्यापर्यंतचा प्रवास असेल, सम्राट चौधरी यांना एकेदिवशी मुख्यमंत्री पदापर्यंतची ऑफर येईल हे नियतीच्याच मनात होते की काय. आज 4 वाजता भाजप बिहारच्या मुख्यमंत्र्‍यांची घोषणा करणार आहे. सम्राट चौधरी यांच नाव सर्वात आघाडीवर मानलं जात आहे कारण राज्यपाल भवनाच्या अधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली आहे.