पिंपळेगुरव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
१५ प्रकारचे दाखले एकाच छताखाली उपलब्ध
दि.१०(पीसीबी) – “भारतीय जनता पक्ष हा अंत्योदयाचा विचार घेऊन वाटचाल करणारा पक्ष आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि नागरिकांच्या समस्यांचे विनाविलंब निराकरण करणे, हेच आमच्या सुशासनाचे अर्थात गुड गव्हर्नन्स मुख्य सूत्र आहे. या शिबिरांच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा थेट जनतेच्या दारी आणून नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केले.
पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रस्व अभियान’ अंतर्गत आयोजित ‘समाधान शिबिराचे’ उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या शिबिराला पक्षनेते प्रशांत शितोळे, माजी महापौर शंकुतला धराडे, शिक्षण मंडळ सभापती रविना अगोंळघर, नगरसेविका तृप्ती कांबळे, नगरसेविका अर्चना तापकीर, नगरसेवक शशिकांत (अप्पा) कदम, नगरसेवक श्याम जगताप, नगरसेविका पल्लवी जगताप, नगरसेविका कोमल काळे, सविता खुळे, निता पाडाळे राज्याचे अप्पर मुख्य सचिव (महसूल व नोंदणी) विकास खारगे, जमाबंदी आयुक्त शैलेश नवल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपायुक्त संजिव पलांडे , अप्पर जिल्हाधिकारी सतिश राऊत, भूमी अभिलेख जिल्हाधिक्षक प्रभाकर मुसळे, प्रांताधिकारी यशवंत माने, चिंचवड अप्पर तहसीलदार जयराज देशमुख, संजय गांधी तहसीलदार अमोल कदम, नगरभूमापन अधिकारी अमित ननावरे, यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी आणि महापालिकेचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले, भाजपच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या धोरणांमुळे सर्वसामान्यांना आता सरकारी कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत.आजच्या या शिबिरात एकाच छताखाली १५ प्रकारच्या विविध सरकारी सेवा आणि दाखल्यांचे वाटप करून नागरिकांच्या वेळेची आणि श्रमाची बचत करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा संघामध्ये आमदार आपल्या दारी या अभियानातून आपण नागरिकांच्या प्रश्नापर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला. ज्या माध्यमातून अनेक प्रश्न तडीस गेले. संजय गांधी निराधार योजनेचे कार्य या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे होत असल्याचे आमदारांनी यावेळी नमूद केले
राज्याचे अप्पर मुख्य सचिव (महसूल व नोंदणी) विकास खारगे यांनी यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराचे कौतुक केले. ते म्हणाले, “महसूल विभाग हा नागरिकांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर निगडित आहे. ‘मिशन डॉक्युमेंट’च्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखद व्हावे आणि राज्याची प्रगती व्हावी, हा दुहेरी हेतू आम्ही साध्य करत आहोत. चिंचवडमधील लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे शासन खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचले आहे.”
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही या शिबिरामागची भूमिका मांडताना सांगितले की, नागरिकांना शासकीय कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी सर्व सोयी-सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी या शिबिरात प्रलंबित फेरफार निकाली काढणे व ७/१२ दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे, भटक्या विमुक्त समाजासाठी विशेष दाखले व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्रे, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ आणि सामाजिक अर्थसहाय्य योजनांची मंजुरी, ॲग्रीस्टॅक, पी.एम. किसान नोंदणी आणि अकृषिक (NA) जमिनीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सामान्य माणसाला सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, हीच आमची प्रामाणिक भावना आहे. ‘गुड गव्हर्नन्स’ म्हणजे केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर सर्वसामान्यांची कामे वेळेत आणि सन्मानाने होणे होय. चिंचवडमध्ये आम्ही ‘आमदार आपल्या दारी’ आणि ‘समाधान शिबिरांच्या’ माध्यमातून प्रशासकीय पारदर्शकता आणली आहे. शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”, अशी ग्वाही आमदार शंकर जगताप यांनी दिली.











































