होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत इराणला काही तासांची मुदत दिली आहे. इराणने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर अमेरिकन सैन्य अवघ्या एका रात्रीत इराणला नकाशावरून पुसून टाकेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. यावर इराणचे प्रत्युत्तर समोर आले आहे. इराणचे राष्ट्रअध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी मंगळवारी सांगितले की, देशाच्या रक्षणासाठी तब्बल एक कोटी ४० लाखांहून अधिक नागरिक आपल्या प्राणांचे बलिदान देण्यासाठी तयार आहेत.
देशाचे रक्षण करण्यासाठी एक कोटी ४० लाखांहून अधिक इराणी लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदन देण्याची तयारी दर्शवली आहे. मी सुद्धा इराणसाठी माझे प्राण देण्यासाठी तयार आहे आणि राहीन, असे विधान पेझेश्कियन यांनी केले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंतची (ईस्टर्न टाइम) ‘मुदत’ निश्चित केली आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी इराण होर्मुझची सामुद्रधुनी उघडणार का? हा महत्त्वाचा प्रश्न होता. मात्र यावर आता इराणनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अंतिम मुदतीपूर्वी इराणकडून आव्हान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची कथित मुदत जवळ येत असताना इराणने माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संभाव्य हल्ल्यांच्या भीतीमुळे इराणी अधिकाऱ्यांनी तरूणांना वीज प्रकल्पांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांभोवती मानवी साखळी तयार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच इराणने युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळून लावला असून हा संघर्ष कायमचा संपुष्टात आणावा, अशी मागणी केली आहे.








































