पिंपरी-चिंचवडमधील निवासी अतिक्रमणांच्या प्रश्नावर राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल!

bpcauthor
2 Min Read
  • भाजप नगरसेवक राहुल कलाटे यांनी मानले देवाभाऊ आणि बावणकुळे यांचे आभार
  • ⁠
    पिंपरी-चिंचवडमधील हजारो कुटुंबांच्या घरांचा आणि त्यांच्या भवितव्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या नागरिकांच्या प्रश्नाला न्याय मिळावा, त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई होऊ नये आणि शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांबाबत स्पष्ट व सर्वंकष धोरण ठरावे, हा आताच्या महापालिका निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा होता आणि याबाबत पक्षाकडून नागरिकांना आश्वासन देण्यात आले होते, ते पूर्ण होते असल्याने भाजपचे जेष्ठ नगरसेवक राहुल कलाटे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

प्रसिद्धी पत्रकात कलाटे म्हणतात,
महाराष्ट्र शासनाने १ जानेवारी २०११ पर्यंतच्या शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी झालेल्या अतिक्रमणांबाबत सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती संबंधित भागातील SRA, म्हाडा तसेच इतर प्राधिकरणांच्या धोरणांचा अभ्यास करून निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शिफारसी करणार आहे. केंद्र शासन किंवा त्यांच्या अधिनस्त प्राधिकरणांच्या जमिनींबाबतही समिती विचार करणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लोकप्रतिनिधी म्हणून हा विषय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, अनेक वर्षांपासून या प्रश्नामुळे नागरिकांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ अतिक्रमण म्हणून न पाहता मानवी आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही विचार करून व्यवहार्य मार्ग काढला पाहिजे, अशी माझी देखील भूमिका आहे.
शासनाने याबाबत विशेष समिती स्थापन करून पुढील धोरणात्मक निर्णयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे, याचे आम्ही पिंपरी चिंचवडकर स्वागत करतो.

या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार!

ही प्रक्रिया केवळ समिती स्थापन करण्यापुरती मर्यादित न राहता, नागरिकांना दिलासा देणाऱ्या ठोस आणि न्याय्य धोरणापर्यंत पोहोचावी, यासाठी पाठपुरावा सुरू राहील.

Share This Article