“विमाननगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; अवैध हुक्का पार्लरवर छापा, ७ जण अटकेत”

0
2

दि.०७(पीसीबी)-पुणे शहरात सुरू असलेल्या गुन्हेगारीविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं असून, विमाननगर परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला आहे.५ एप्रिल २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत ‘अॅटलान्टिस रूफ टॉप लाऊंज’ या नामांकित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या ठिकाणी विनापरवाना हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

छाप्यात पोलिसांना हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य, विविध फ्लेवर्स, कोळसा तसेच परदेशी मद्याचा साठा आढळून आला. या कारवाईत एकूण १ लाख ४७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, काही रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी विमाननगर, खराडी आणि वाघोली परिसरातील रहिवासी असून, त्यांच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २००/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध कडक पाऊल उचलत कारवाईचा बडगा उगारला असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.शहरातील बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध पोलिसांची ही मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.