दि.०३(पीसीबी)-विराट हिंदू संमेलन, चिंतामणी वस्ती ,वाल्हेकरवाडी रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी पीएमआरडीए ग्राउंड वाल्हेकरवाडी येथे संपन्न झाले. कार्यक्रमासाठी आशीर्वाद देण्यासाठी आळंदी येथील ह भ प श्रीहरी महाराज गीतेकर, पंचपरिवर्तन विषय मांडण्यासाठी श्री मुकुंदराव कुलकर्णी, कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,पुणे विभाग तसेच मातृशक्ती म्हणून भारतीताई तारे पुणे जिल्हा कार्यवाहीका राष्ट्र सेविका समिती तसेच विराट हिंदू संमेलनाचे अध्यक्ष श्री श्रमिकजी गोजमगुंडे आदी मंचावर उपस्थित होते.
सकाळी दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाने झाली. यामध्ये आजूबाजूच्या मातृविद्यालय, प्रेरणा विद्यालय तसेच महानगरपालिकेच्या शाळेतील 800 पेक्षा अधिक विद्यार्थी व पालक यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात नादवेद संगीत अकादमीने संघाच्या विविध गीतांच्या गायनाने झाली. त्यानंतर महिला शाहीरी पथकांने शिवाजी महाराजांचे विविध पोवाडा यांचे सादरीकरण केले. सह्याद्री स्मार्ट किड्स संस्थेतर्फे लहान मुलांनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाच्या दीप प्रज्वलनावेळी केशव शंखनाद पथकाने शंखानाद करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
ह भ प श्रीहरी महाराजांनी कार्यक्रमाला आशीर्वाद देताना विविध गोष्टींची उदाहरणे देऊन समाजात हिंदुत्वाच्या एकतेची व समरसतेची गरज का आहे हे स्पष्ट केले तसेच यामध्ये संतांचे व वारकरी संप्रदायाचे योगदान स्पष्ट केले. भारतीताईंनी मातृशक्तीच्या संदर्भात कुटुंबामध्ये महिलांचे योगदान तसेच कुटुंबाच्या एकतेमध्ये संस्कार व समाजातील महिलांच्या योगदानाचा उल्लेख केला. संमेलनाचेअध्यक्ष श्री श्रमिक गोजमगुंडे यांनी आपल्या जोशपूर्ण व तडफदार वक्तृत्वाने समाजातील लव जिहाद या समस्येकडे समाजाचे लक्ष वेधून घेतले व यासाठी हिंदू समाजाने जागरूक राहून एक होऊन या असुरीशक्तींचा बीमोड केला पाहिजे असे आवाहन केले. श्री मुकुंद जी कुलकर्णी यांनी संघाच्या शताब्दी निमित्त पंच परिवर्तन मुद्दे जसे की कुटुंब प्रबोधन, समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वबोध आणि नागरी शिष्टाच्या याविषयी गोष्टींच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती केली. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताच्या गायनाने झाली. कार्यक्रमांमध्ये परिसरातील विविध धार्मिक मंदिराचे अध्यक्ष तसेच नगरसेवकांचा नागरी सत्कार केला गेला. कार्यक्रमासाठी परिसरातील सुमारे दीड हजार पेक्षा अधिक नागरिक बंधू-भगिनी व मुले हजर होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.








































