हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो जूनपासून धावणार; आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

1 Min Read


दि.०२(पीसीबी)-पुणेकरांसाठी, विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. माण–हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिका ३ चा पहिला टप्पा येत्या जून महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

या प्रकल्पाचा एकूण विस्तार २३.२ किलोमीटर असून, सप्टेंबरपर्यंत संपूर्ण मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या प्रकल्पाचे सुमारे ९४.२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या १२ स्थानकांवरील बहुतेक तांत्रिक चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, सध्या सिग्नलिंग प्रणालीच्या अंतिम चाचण्या सुरू आहेत.

दरम्यान, उर्वरित ११ स्थानकांवरील कामाला थोडा विलंब होत आहे. प्रवाशांच्या प्रवेश आणि निर्गमनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

आयुक्तांनी स्वतः या प्रकल्पाची पाहणी करून कामांचा आढावा घेतला असून, उर्वरित तांत्रिक अडचणी लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर पुण्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून, हजारो आयटी कर्मचाऱ्यांचा रोजचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

Share This Article