पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भ्रष्ट प्रशासनामुळे एमएनजीएल ची हजारो कनेक्शन रखडली

0
2

दि.०२(पीसीबी)-पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि एमएनजीएल यांच्यातील खोदाईच्या शुल्काबाबतच्या आडमुठेपणामुळे शहरातील नागरिकांना स्वस्त आणि किफायतशीर ʻपाईप नॅचरल गॅस (पीएनजी)ʼ जोडणी पासून वर्षानुवर्षे वंचित राहावे लागल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आता मात्र जागतिक युध्द परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गृहनिर्माण सोसायट्यांना पाईप नॅचरल गॅस (पीएनजी) घेणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले असून दिवसाला १८० गॅस जोड देणाऱ्या एमएनजीएल कडून आता रात्रीत जादू झाल्याप्रमाणे दिवसाला तिप्पट म्हणजे ४०० ते ५०० गॅस जोड देण्यात येत आहेत. दरम्यान, महापालिकेच्या एका अतिरिक्त आयुक्तांनी गेली सहा-सहा महिने कोणतेही सबळ कारण नसताना फायली अडवून ठेवल्याने कनेक्शन रखडल्याचे समजले.

पिंपरी- चिंचवड मध्ये जवळपास ४० टक्के गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये एमएनजीएल कंपनीचा पीएनजी गॅस जोड आहे. उर्वरित सोसायट्यांमध्येही हे किफायतशीर जोड मिळावेत यासाठी गृहनिर्माण सोसायट्या प्रयत्नशील होत्या. मात्र हे जोड देण्यासाठी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेकडून एमएनजीएल कडे खोदकामाबद्दल मागितले जाणारे शुल्क जास्त असल्याने ते कमी करावे, असा एमएनजीएलचा दावा होता. गॅसवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करावे लागते. खोदकाम शुल्काच्या या वादात गॅस जोड देण्याचे काम वर्षानुवर्षे रखडले होते. या व्यतिरिक हे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून काही राजकीय नेतेही जास्त ʻहप्ताʼ ʻटक्केवारीʼ ʻभागीदारीʼ मागत होते, त्यामुळेही काम रखडले होते.

यासंदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र महानगरपालिकेचे शुल्क ʻएमएनजीएलʼने दिले असते तर आम्ही केव्हाच रस्ते खोदायला परवानग्या दिल्या असत्या, अशी भूमिका घेतली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेतही यासंदर्भात शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. पण त्यातून कोणताही तोडगा न निघाल्याने गॅस जोड देणे रखडले होते.
मध्य – पूर्वेतील युद्धस्थितीमुळे घरगुती सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याने केंद्र सरकारने यासंदर्भात तातडीने पावले उचलली आहेत. परिणामी गॅस जोड देण्याचे काम प्राधान्याने होऊ लागले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या तुलनेत स्वस्त, आणि सुरक्षित गॅस जोड घेण्यास अनेक नागरिकांची पसंती आहे. जाधववाडी, चिखली येथील सिल्वर सिटी सोसायटी,निलय सोसायटी देवराई सोसायटी, संकेश्वर सोसायटी , मोशी बोऱ्हाडेवाडी येथील सिल्वर सेंट्रल सोसायटी, संकेश्वर आयकॉन सोसायटी, नेवाळे वस्ती-चिखली येथील ऐश्वर्यएम निवारा , साई संस्कार सोसायटी आदी सोसायट्यांना अर्ज करूनही गेल्या सुमारे तीन वर्षापासून गॅस जोड देण्यात आलेला नाही.

तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार
यासंदर्भात एमएनजीएलच्या प्रतिनिधीने सांगितले कि, पूर्वी अनेक सोसायट्यांना या गॅसची फारशी गरज भासली नाही. काही ठिकाणी भाडेकरूंचे प्रमाण जास्त आहे, तर काही ठिकाणी विद्यार्थी राहतात. त्यामुळे आम्हाला दुसरीकडे जायची वेळ आल्यावर या गॅस जोडचा काय उपयोग अशी या भाडेकरूंची भावना होती. मात्र आता गृहनिर्माण सोसायट्यांनी गॅस जोड घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन एमएनजीएल कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र एकूणच हा सर्व प्रकार म्हणजे ‘ तहान लागल्यावर विहीर खोदण्याʼचा असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात चिखली – मोशी – पिंपरी – चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले कि, ” भोसरी विधानसभा मतदारसंघातील ३० टक्के गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाईप गॅस ʻपीएनजीʼ जोड नाही. पिंपरी – चिंचवड महानगरपालिका आणि ʻएमएनजीएलʼकंपनीत रस्ते खोदाईच्या दरावरून मतभेद असल्याने अनेक महिने नवीन गॅस जोड देण्याचे काम रखडले होते.
फक्त चिखली, मोशी, चऱ्होली नाही तर वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे या भागातही कनेक्शनचे काम रखडलेले आहे.
अशी आहे ʻपीएनजीʼ योजना

ʻपाईप गॅस (पीएनजी)ʼ हा महाराष्ट्रातीलच उरण आणि बॉम्बे हाय येथून निर्माण होतो. त्यामुळे त्याची उपलब्धता लवकर होते. तसेच हा गॅस स्वस्त, तुलनेने खूपच सुरक्षित आहे. या गॅस जोडसाठी एमएनजीएल कंपनीकडून विशेष योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत हा जोड घेणाऱ्या ग्राहकाला त्याच्या पहिल्या बिलात ५०० रुपयां पर्यंत सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. तसेच ५०० रुपयांचे अँप्लिकेशन शुल्क आणि ऑनलाईन कनेक्शन अर्जाचे ५५० रुपयांचे शुल्कही माफ करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीच्या एका प्रतिनिधीने दिली.