आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ८० कोटी ७४ लाखांची वसुली
दि.०१(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ मध्ये पाणीकर वसुलीत अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास घडवला आहे. एकूण ८० कोटी ७४ लाख ९ हजार ८१० इतकी पाणीकर वसुली करण्यात आली असून, मागील सर्व वर्षांच्या तुलनेत हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा ठरला आहे क्षेत्रनिहाय वसुलीमध्येही उल्लेखनीय कामगिरी झाली असून, सांगवी क्षेत्राने ७ कोटी ६५ लाख ७२ हजार २४३ इतकी सर्वाधिक वसुली करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आढावा बैठका, थकीत मिळकतधारकांवर नियमानुसार कारवाई, डिजिटल नोटिसा तसेच ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पारदर्शक व सुलभ कार्यपद्धतीमुळे वसुली प्रक्रियेला गती मिळाली आणि महसुलात विक्रमी वाढ साध्य झाली.
या वाढीव महसुलातून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध विकासकामांना गती देण्यात येणार आहे. नवीन जलवाहिन्यांची उभारणी, गळती शोध व नियंत्रण यंत्रणा मजबूत करणे, जलशुद्धीकरण प्रकल्पांचे आधुनिकीकरण तसेच वितरण यंत्रणेची क्षमता वाढविणे यांसारख्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने सर्व करदात्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत असून, उर्वरित थकीत पाणीकर तात्काळ भरून शहराच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
……..
गेल्या सहा वर्षात पाणीकर वसुलीत होतेय सातत्याने वाढ
आर्थिक वर्ष २०२०-२१ : ४१ कोटी ८४ लाख
आर्थिक वर्ष २०२१-२२ : ५४ कोटी ९८ लाख
आर्थिक वर्ष २०२२-२३ : ५७ कोटी ६१ लाख
आर्थिक वर्ष २०२३-२४ : ७८ कोटी ५६ लाख
आर्थिक वर्ष २०२४-२५ : ७६ कोटी ३२ लाख
आर्थिक वर्ष २०२५-२६ : ८० कोटी ७४ लाख
……
८० कोटींचा टप्पा पार करणे ही केवळ आर्थिक कामगिरी नाही, तर नागरिकांनी महापालिकेवर दाखविलेल्या विश्वासाची पावती आहे. या महसुलाचा प्रत्येक रुपया शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी वापरला जाईल, असे महापौर
रवि लांडगे यांनी सांगितले.
महसुलातील विक्रमी वाढ ही आर्थिक शिस्त आणि प्रभावी अंमलबजावणीचे उदाहरण आहे. या निधीतून गळती नियंत्रण, जलशुद्धीकरण प्रकल्पांचे उन्नतीकरण आणि वितरण यंत्रणेची क्षमता वाढविण्यावर विशेष भर दिला जाईल.
पाणीकर वसुलीत झालेली ही सर्वकालीन उच्चांक कामगिरी ही नियोजनबद्ध पाठपुरावा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याचे हे फलित आहे. या निधीच्या साहाय्याने पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल. नागरिकांनी अशाच प्रकारे कर भरून महानगरपालिकेच्या विकास कामात योगदान द्यावे, तसेच कर चुकवणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल,मुख्य अभियंता
असे प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.







































