दि.०१(पीसीबी)-आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी चिंचवडला जगात कोणी ओळखत नाही, अशा आशयाचे जे वाक्य बोलले, ते पूर्णपणे चुकीचे आहे. अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पंधरा दिवसांत त्या शहराबद्दल पूर्ण माहिती न घेता असे विधान करणे हे अजिबात जबाबदारीचे लक्षण नाही. पिंपरी चिंचवड शहराला फार मोठा आणि देदीप्यमान असा इतिहास आहे. या शहरात अनेक राजवटी झाल्या आहेत. संत, साधू, क्रांतिकारक, उद्योजक यांची ही पवित्र भूमी आहे. शेजारीच ज्ञानोबांची आळंदी व तुकोबांचे देहू आहे. या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी याच पिंपरी चिंचवड शहरातून जावे लागते. औद्योगिक शहर म्हणून १९५०पासून या शहराची ख्याती आहे. म्हणूनच आज या शहराला उद्योगनगरी असेदेखील संबोधले जाते.
एकेकाळी आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असणाऱ्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनीच आज तिला कोणी ओळखत नाही, असे बेजबाबदारपणाचे विधान करणे, हे खरंच त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. ठीक आहे, अनवधानाने त्यांच्याकडून हे वाक्य उच्चारले गेले असेल, असे समजूया. पण मुळात गंधर्व महाविद्यालय व महानगरपालिका यांची तुलनाच होऊ शकत नाही. तुलना ही दोन समान विषयाबाबत, गोष्टीबाबत होते, एवढेही भान आयुक्त पदावरील व्यक्तीला नसावे, हे अत्यंत खेदजनक आहे. आणखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हे चुकीचे विधान बोलल्यानंतर शहरात जागोजागी उद्रेक झाला; अनेकांनी त्यांच्या परीने निषेध केला; तरीदेखील त्यांनी अद्यापपर्यंत दिलगिरीदेखील व्यक्त केली नाही, याचे अत्यंत वाईट वाटते. आपले चुकले हे जर त्यांनी मोकळेपणाने मान्य केले व तसे जाहीरपणे सांगितले, तर शहरवासीय नक्की समजून घेतील, याबद्दल आयुक्तांनी खात्री बाळगावी; कारण ही वारकऱ्यांची भूमी आहे. येथे ज्ञानोबा-तुकोबांचे निस्सीम भक्त राहतात. त्यांचे मन विशाल आहे. म्हणूनच आपण चुकलो आहे, हे आयुक्तांनी जाहीरपणे कबूल करावे आणि या विषयावर पडदा टाकावा, हीच त्यांच्याकडून अपेक्षा असेल.
संदीप भानुदास तापकीर
(इतिहास अभ्यासक आणि पिंपरी चिंचवड शहरातील लेखक)





































