“हा आमचा मुलगा नाही!”म्हणत अर्धवटझालेला अंत्यसंस्कार थांबवला साताऱ्यात नक्की काय घडलं?

2 Min Read

दि.०१(पीसीबी):सातारा जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेहांची अदलाबदल झाल्यामुळे एका तरुणाच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया अर्धवट थांबवावी लागल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

ही घटना मंगळवारी उघड झाली, जेव्हा २६ वर्षीय आनंद ओव्हाळ यांच्या कुटुंबीयांना दिलेला मृतदेह प्रत्यक्षात दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे लक्षात आले. आनंद ओव्हाळ यांचा अपघातानंतर उपचार सुरू होते आणि सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी ५१ वर्षीय सुरेश खोमणे यांचाही मृत्यू झाला होता.

मंगळवारी सकाळी खोमणे यांच्या नातेवाईकांनी चुकून आनंद ओव्हाळ यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तर ओव्हाळ यांच्या कुटुंबीयांना उरलेला मृतदेह देण्यात आला. मात्र वाई येथे पोहोचल्यानंतर चेहरा उघडताच हा आमचा मुलगा नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले आणि त्यांनी तातडीने सातार्‍यात धाव घेतली.

तोपर्यंत आनंद ओव्हाळ यांचा मृतदेह आराळे गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला होता. अगदी चितेला आग लावून काही मिनिटे झाली असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करून अंत्यसंस्कार थांबवले. अर्धवट जळालेला मृतदेह आणि चितेवरील जळालेली लाकडे अशा अवस्थेत मृतदेह आढळून आला.

या प्रकरणी सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने तत्काळ कारवाई करत शवविच्छेदन विभागातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची चूक घडल्याचे समोर आले असून, त्यामुळे रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मृताच्या नातेवाईकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे. “आमच्या कुटुंबाचा एकुलता एक मुलगा गमावला, त्यातही असा निष्काळजीपणा असह्य आहे,” अशी प्रतिक्रिया कुटुंबीयांनी दिली.

या घटनेमुळे सातार्‍यातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Share This Article