अजित दादांच्या गुडबुक्स मधिल आयएएस कुणाल कुमार यांची स्वेच्छानिवृत्ती मुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ

0
3

दि.२८(पीसीबी):राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. धडाकेबाज निर्णयशैलीसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी कुणाल कुमार यांनी अचानक स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील अधिकृत आदेशही जारी केले असून, मार्च अखेरनंतर ते सेवेतून बाहेर पडणार आहेत.

1999 बॅचचे आयएएस अधिकारी असलेले कुणाल कुमार सध्या मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून 2014 ते 2018 या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

स्मार्ट सिटी प्रकल्प, चोवीस तास पाणीपुरवठा योजना आणि विविध डिजिटल उपक्रम राबवत त्यांनी शहराच्या विकासात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या कार्यशैलीत निर्णयक्षमता, वेग आणि काटेकोर अंमलबजावणी यांचा ठसा स्पष्टपणे दिसून आला.

एकेकाळी माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या ‘गुडबुक’मध्ये राहिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होत होती. प्रशासनावर मजबूत पकड आणि प्रभावी कामकाजामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.

मात्र त्यांच्या या अचानक स्वेच्छानिवृत्तीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या निर्णयामागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट नसली, तरी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

आता कुणाल कुमार यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.