पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे जागतिक जल दिन उत्साहात साजरा

0
4

दि.२४(पीसीबी) – पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण येथे जागतिक जल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचा जागतिक जल दिन “पाणी व लिंग समानता” या मुख्य आशयावर आधारित असून “जिथे पाणी वाहते तिथे समानता वाढते” हा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

आजच्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र जाणवत असून विशेषतः ग्रामीण भागातील महिला व मुलींना त्याचा अधिक फटका बसतो. सुरक्षित पिण्याचे पाणी, पाणी साठवण, नियोजन आणि पाणी व्यवस्थापनामध्ये महिला व मुलींना समान नेतृत्व व संधी देणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या निमित्ताने सायन्स पार्कमध्ये “माझी नदी, माझीच जबाबदारी” या प्रदर्शनावर आधारित विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान जलदिंडी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वास येवले यांनी “जागतिक जल दिनाचे महत्त्व” या विषयावर मार्गदर्शन केले.

हाऊसिंग सोसायटीमध्ये पाणी बचतीचे मार्ग व “वॉटर ऑडिट” यावर डॉ. प्राजक्ता रुद्रावार (निगडी) यांनी प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली. तसेच, एनएसएस युनिट, जेएसपीएम कॉलेज ताथवडे यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “जल हेच जीवन” या पथनाट्याद्वारे पाणी संवर्धनाचा प्रभावी संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात आला. बालसमूहाद्वारे सादर करण्यात आलेल्या नाट्यप्रयोगातूनही पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

यानंतर “पर्यावरण विषयक सहसंवाद” या विषयावर विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली या सहसंवादात अंघोळीची गोळी संस्थेचे श्री. माधव पाटील, इसीजीचे श्री. सिकंदर घोडके, श्री सिताराम बल्लाळ फाउंडेशनचे श्री. विष्णू शेठ वाळुंज, सिटीझन फोरमचे श्री. तुषार शिंदे तसेच सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपरिया यांनी सहभाग नोंदवला.

या चर्चेत पाण्याची साठवण, शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी मनपाद्वारे राबविण्यात येणारी स्काडा प्रणाली, शहरातील पर्यावरणीय दृष्टिकोन आणि जनसहभाग यावर भर देण्यात आला. प्रत्येक दिवस “जल दिवस” म्हणून साजरा करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी केला व त्यानुसार इसीएच्या सौजन्याने जल दिनाची प्रतिज्ञा श्री. सुनील पोटे यांनी दिली.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थापक संचालक श्री. प्रवीण तुपे, डॉ. श्रद्धा खंपरिया, जलदिंडीचे श्री. आनंद पानसे, श्री. मुथीयान, सौ. गीता भावसार व इतर कार्यकर्त्यांनी केले